पोलिसांच्या मदतीला युवकांची स्पेशल ऑफिसरची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:23+5:302021-05-07T04:10:23+5:30
पंढरीनाथ नामुगडे कदमवाकवस्ती : ब्रेक द चेन अंतर्गत सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये पूर्व हवेलीतील लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत ...
पंढरीनाथ नामुगडे
कदमवाकवस्ती : ब्रेक द चेन अंतर्गत सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये पूर्व हवेलीतील लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पोलिसांच्या मदतीसाठी गावातील स्थानिक तरुण उतरले आहेत. त्यांच्या मदतीने स्पेशल पोलीस अधिकारी (SPO) ही संकल्पना राबविली जाणार आहे.
कदमवाकवस्तीसाठी बुधवारी (दि. ५) सायंकाळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक भागवत शेंडगे, युवा नेते चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियंका भिसे व स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून काम करण्यास इच्छुक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे म्हणाले की, लॉकडाऊनचे नियम झुगारून विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्या नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी परिसरातील विश्वासातील तरुणांची फौज तयार करून त्यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. पोलिसांना दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांचा तपास आरोपपत्र तयार करण्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आणि संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीचे काम करावे लागत आहे. त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये काम करू इच्छित असलेल्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी मदत करू .
ओळपत्र देणार, मात्र दुरुपयोग केल्यास कारवाई
सर्व युवकांना पोलीस स्टेशनकडून ओळखपत्र, टीशर्ट देण्यात येणार आहे. तर या ओळ्खपत्राचा दुरूपयोग होताना दिसल्यास तत्काळ तास निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. सध्या ४० ते ५० युवकांनी यासाठी संमती दर्शवली. या सर्वामध्ये गट तयार करून रोज बदलून प्रत्येक गटास ड्युटी दिली जाणार आहे. परिसरामध्ये नागरिकांची गर्दी झाली असेल तरी याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती देणे.
- कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा यासाठी विशेष काळजी घेणे. पोलिसांनी केलेल्या तपासणी नाक्यावर थांबून वाहन तपासणी करण्यास पोलिसांना मदत करणे. रात्री परिसरात गस्त घालणे.
फोटो ओळ- लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये युवकांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुभाष काळे व उपनिरीक्षक भागवत शेंडगे.