पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचं 'ऑपरेशन वर्षा २१'; विविध ठिकाणी १५ पथकं रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 08:50 PM2021-07-23T20:50:15+5:302021-07-23T20:52:10+5:30
अन्नधान्य, आरोग्य सुविधा पुरवण्यासोबतच बचाव कार्य राबविणार
पुणे : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. येथील परग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर सरसावले आहे. दक्षिण मुख्यालयातर्फे ऑपरेशन 'वर्षा २१' अंतर्गत पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन आणि बाॅम्बे इंजिनिअर गृपचे १५ पथके रवाना करण्यात आले आहे. अन्नधान्य, आरोग्य सुविधा पुरवण्यासोबतच बचाव कार्य हे पथक राबविणार आहे.
राज्यात घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे ठाणे, मुंबई, कोकणातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेले आहे. पुरामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सध्या या ठिकाणी स्थानिक प्रशासन तसेच एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू आहे. मात्र, यालाही मर्यादा येत आहे. २०१९ मध्ये सांगली येथे आलेल्या महापुरात लष्कराने मोठी मदत केली होती. त्याच पार्श्वभूमीवर वरील पूरग्रस्त जिल्ह्यात मदतीसाठी लष्कराचे दक्षिण मुख्यालय पुढे आले आहे.
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन वर्षा ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन आणि बाॅम्बे इंजिनिअर गृपचे १५ पथक पूरग्रस्त जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर अन्नधान्य तसेच वैद्यकीय सुविधांची सामग्रीही रवाना करण्यात आले आहे. हे सर्व मदत कार्य नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचले असून त्याठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या पूरग्रस्तांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
नाैदलातर्फेही बचावकार्य सुरू
वेस्टर्न नेव्हल कमांडतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पथके रवाना करण्यात आली आहे. यात नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नौदलाचे ७ पथक सध्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात बचावकार्य राबवित आहेत. आयएनएस शिक्रा येथून पोलादपूर आणि रायगड जिल्ह्यात मदत कार्य करण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. बचार कार्य करण्यासाठी या पथकांकडे रबर बोट, हेलिकॉप्टर, लाईफ जॅकेट, तसेच पाणबुडेही आहेत. अत्यंत अनुभवी असलेल्या या पथकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहेत.
राज्यात सुरू असलेल्या पूरपरिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी लष्कर सरसावले आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे बचाव कार्य सुरू आहे. यासाठी ऑपरेशन वर्षा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवस्थेसह, अन्नधान्याची मदतही पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली आहे.
- लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, प्रमुख दक्षिण मुख्यालय