Arogya Bharti: आरोग्य पेपटफुटीमध्ये बीडमधून आणखी एका एजंटला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 08:57 PM2021-12-20T20:57:15+5:302021-12-20T20:58:32+5:30
आरोग्य पेपरफुटी प्रकरणात भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप याला सायबर पोलिसांनी अटक केली होती...
पुणे : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात सायबर पोलिसांनी रविवारी बीडमधून आणखी एकाला अटक केली आहे. संजय शाहूराव सानप (वय ४०, सध्या रा. धनंजय निवास, संत ज्ञानेश्वर नगर, बीड, मुळ - वडझरी, ता. पाटोदा, बीड) असे त्याचे नाव आहे. आरोग्य पेपर फुटीमध्ये आतापर्यंत १८ जणांना अटक केली असून त्यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात हा ८ वा आरोपी आहे.
आरोग्य पेपरफुटी प्रकरणात भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने एजंट संजय सानप याला आरोग्य विभागाचे गट क व गट डचे पेपर पुरविल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक मीनल सुपे -पाटील व त्यांच्या सहकार्यांनी संजय सानप याला रविवारी अटक केली. त्याला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले.
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले की, संजय सानप याला परीक्षेपूर्वी गट ड व क या संवर्गाचा पेपर मिळाला होता. त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने हे पेपर अनेक परीक्षार्थींना दिला आहे. आरोपीने किती जणांना हा पेपर दिला. त्यांच्याकडून किती पैसे स्वीकारले, याबाबत सखोल तपास करायचा आहे. आरोपी याने कोणाच्या मदतीने व कशाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या गट ड व क या संवर्गाचा पेपर परीक्षार्थींना दिला,याचा तपास करायचा आहे. त्याच्या घराची झडती घेऊन त्यामध्ये मिळून येणार्या पुराव्याच्या आधारे आरोपीकडे तपास करायचा असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटीमध्ये प्रामुख्याने मुंबईतील मुख्य सुत्रधार महेश मोटले व खलाशी प्रकाश मिसाळ हे वगळता इतर प्रामुख्याने औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा येथील आरोग्य विभागातील अधिकारी,क्लार्क, एजंट आणि क्लास चालकांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील तीन क्लास चालक, एजंट तसेच जालना, बुलढाणा येथील एजंट व परीक्षार्थींचा समावेश आहे.