Arogya Bharti| आरोग्य पेपरफुटी प्रकरण: २० जणांना पेपर वितरित करुन कमाविणार होते १ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:00 PM2021-12-10T13:00:40+5:302021-12-10T13:03:08+5:30
आरोग्य विभागाच्या गट ड चा पेपर फुटला. त्याप्रमाणेच गट क चा पेपर फुटला असल्याचा संशय असल्याचे लोकमतने प्रकाशित केले होते...
पुणे:आरोग्य विभागाचा ड गटाचा पेपर फोडून तो २० जणांपर्यंत पोहचवायचा आणि त्यांच्याकडून १ कोटी रुपये घेऊन ते महेश बोटले आणि प्रशांत बडगिरे यांनी प्रत्येकी ५० लाख रुपये वाटून घेण्याचा कट या दोघांनी रचला होता. मात्र, त्यांनी ज्यांना हा पेपर वितरित केला त्यांनी तो आणखी अनेकांना वितरित केला. त्यातून तो व्हॉटसॲपवर व्हायरल झाल्याने पेपर फुटीचे हे बिंग बाहेर पडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी सहसंचालक महेश बोटले याला आज न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे.
सायबर पोलिसांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान चे सहसंचालक महेश बोटले याला बुधवारी रात्री अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात हा पेपर कसा फोडला व त्यातून ते कशी कमाई करणार होते, हे पुढे आले आहे. महेश बोटले हा २४ व ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या गट क व ड पदाचे भरतीचे लेखी परिक्षेचा पेपर समितीचा सदस्य म्हणून पेपर ताब्यात असताना त्याने गट ड च्या पदाचे परिक्षेचा पेपर परिक्षेपूर्वी मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याला दिले होते. त्याबदल्यात परिक्षार्थीकडून बडगिरे याने स्वीकारलेल्या रक्कमेतून अर्धी रक्कम बोटले याच्या वाट्याला येणार होती. महेश बोटले याच्याकडून त्याचा मोबाईल, लॅपटॉप, त्याच्या कार्यालयातील वापरातील संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह व सीसीटीव्ही स्टोअरेजसह डिव्हीआर ई साधने तपासासाठी जप्त करण्यात आली आहे. त्याचा रिओपन करुन पंचनामा करुन डिजिटल पुरावा मिळवायचा आहे. त्याने बडगिरे याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला प्रश्नपत्रिका पाठवली
होती का? अटक आरोपींना आणखी कोणी मदत केली? बोटले याने पेपर नेमका कशा पद्धतीने बडगिरे याला पाठवला, तसेच विभागातील पेपर सेट करणार्या समितीतील इतर सदस्य लाभार्थी आहेत का याचा तपास करण्यासाठी बोटले याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती. न्यायालयाने बोटले याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गट 'क' चा पेपर फुटल्याचा तपास करणार
आरोग्य विभागाच्या गट ड चा पेपर फुटला. त्याप्रमाणेच गट क चा पेपर फुटला असल्याचा संशय असल्याचे आज लोकमत ने प्रकाशित केले होते. महेश बोटले या गट क व गट ड या पदाचे भरतीचे लेखी परिक्षेचा पेपर समितीचा सदस्य आहे. त्याने गट ड शिवाय इतर गटाचे भरती परिक्षेमध्ये आणखी कोणत्या एजंटांना त्या परिक्षेचे पेपर्स वितरीत केले आहे का याचा तपास करणार आहे. इतर कोणकोणत्या पदाचे भरती परिक्षेकरीता बनविलेला लेखी पेपर सेट करणार्या समितीत समावेश होता. तसेच इतर कोणती जबाबदारी दिलेली होती. त्या जबाबदारी दरम्यान त्याने त्याचा स्वत:चे फायद्याकरीता किती प्रकरणात उपयोग केला याचा तपास करायचा असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी न्यायालयात सांगितले.