आरोग्य विभाग भरतीचा पेपर मुंबईतूनच फुटला; आरोग्य संचालनालयातूनच सहसंचालकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:05 PM2021-12-08T20:05:51+5:302021-12-08T20:12:29+5:30
मुंबईतील आरोग्य संचालयनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनच हा पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे...
पुणे :आरोग्य विभग गट ड परिक्षेचा पेपर फुटीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहचले असून मुंबईतील आरोग्य संचालयनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनच हा पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी सह संचालक महेश बोटले याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लातूर येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने आपल्याला बोटले याच्याकडून पेपर मिळाला असल्याची कबुली दिल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचा ड परिक्षेचा पेपर फुटीप्रकरण सायबर पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. हा पेपर फुटीमधील एजंट, क्लासचालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून थेट प्रत्यक्ष पेपर फोडणार्यापर्यंत पोहचण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. त्यात अनेक मोठमोठे अधिकारी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महेश बोटले याच्याकडे पेपर सेटरांशी संपर्क साधणे, तो सुरक्षित ठेवणे, परिक्षा घेणाऱ्या कंपनीशी संपर्क ठेवणे अशी जबाबदारी असल्याचे पुढे आले आहे. पेपर तयार करणार्या समितीमध्येही बोटले याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रशांत बडगिरे याला मंगळवारी अटक केल्यानंतर सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी त्याची चौकशी केली. त्यातून या पेपरफुटीसंबंधी अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यातूनच बडगिरे याने महेश बोटले याच्याकडून पेपर मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी सायबर पोलिसांच्या पथकाने मुंबईतून बोटले याला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालय व घरझडती घेण्यात आली. आज दुपारी बोटले याला पुण्यात आणले असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.
बडगिरे याला मिळाले ३३ लाख
बडगिरे याने आपल्याला १५ लाख मिळाल्याचे अगोदर सांगितले होते. मात्र, अधिक चौकशीत त्याने आपल्याला ३३ लाख मिळाल्याची कबुली दिली आहे. बडगिरे याने ज्यांच्याकडून पैसे घेऊन पेपर पुरविला. त्यांनी तो पुढे अनेक एजंट, क्लास चालकांना पुरवून त्यातून आतापर्यंत ८० लाख रुपये उकळल्याचे पुढे आले आहे. ही लिंक आणखी पुढे गेली असण्याची शक्यता आहे. त्यातून करोडो रुपयांची मलई खाल्याचे दिसून येत आहे.