शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:38 PM2022-05-17T18:38:20+5:302022-05-17T18:38:46+5:30
शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे
पुणे : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मनसैनिक अयोध्येसाठी सज्ज झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी राज ठाकरेंसोबत अयोध्येला यावे असे आवाहन मनसैनिकांकडून करण्यात येत आहे, त्यातच उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे येऊ देणार नाही असे सांगितले आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांचे अयोध्येत स्वागत केले जाईल. असंही ते म्हणाले होते. परंतु मनसेने या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता अयोध्या दौऱ्याच्या जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातही मनसेची अयोध्येला जाण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे. पुणे शहरातून ५ हजारच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. अशी माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
बाबर म्हणाले, अयोध्येसाठी आम्ही पुणे शहरातून नावनोंदणी सुरु केली आहे. त्यासाठी ''चला अयोध्या राज साहेबांसोबत'' असा फॉर्म तयार करण्यात आला आहे. आज दिवसभरात ४५० ते ५०० फॉर्म भरले गेले आहेत. कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य नागरिकही अयोध्येला येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. आमचा पुणे शहरातून जवळपास ५ हजार नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा मानस आहे.
नावनोंदणी अभियानात उत्तर भारतीयांचाही समावेश
नावनोंदणी सुरु असताना उत्तर भारतीय नागरिकांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ब्रिजभूषण यांचा विरोध वेगळा आहे. आम्ही उत्तर भारतीय २५ वर्षांपासून इथे महाराष्ट्रात राहत आहोत. महाराष्ट्रात राहून आम्ही पुढे गेलोय. मग उत्तर प्रदेश मध्ये सुखी झालो. त्यांना त्याच्याबद्दल काही माहित नाही. ते तिकडं बोलतात त्याचा त्रास आम्हाला इथं होतोय. आम्ही सगळे राज साहेबांसोबत अयोध्येला जाणार आहे. जवळपास २ ते ३ हजारचा ग्रुप महाराष्ट्रातून अयोध्येला जाणार आहे. राज साहेब करतात ते योग्य आहे. ब्रिजभूषणला साहेब काय बोलतात हे कळत नाही, त्यांना मराठी कळत नाही. त्याला काही माहित नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात संघर्ष झाल्यास आम्ही राज साहेबांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.