दिवसात तब्बल चारशे जागरण गोंधळ
By admin | Published: May 4, 2015 02:56 AM2015-05-04T02:56:17+5:302015-05-04T02:56:17+5:30
निमगाव खंडोबा येथील खंडोबा मंदिराजवळ रविवारी (दि. ३) एका दिवसात चारशे जागरण गोंधळ झाले असल्याचा विक्रम झाला आहे, अशी माहिती
दावडी : निमगाव खंडोबा येथील खंडोबा मंदिराजवळ रविवारी (दि. ३) एका दिवसात चारशे जागरण गोंधळ झाले असल्याचा विक्रम झाला आहे, अशी माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुळदैवत असलेले खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. येथे चैत्र व माघ महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक येतात. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक भक्त येथे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. सध्या लग्नसराई आणि वैशाख महिना असल्याने भाविक भक्त येथे येऊन दर्शन घेतात. नवीन लग्न झालेले राज्यभरातील नवदाम्पत्य येथे दर्शनासाठी येतात.
याबरोबरच मोठ्या संख्येने भाविक जागरण गोंधळ घालण्यासाठी निमगाव खंडोबाला येतात.
चैत्र पौर्णिमेनंतर पहिल्याच रविवारी येथे मोठी गर्दी झाली. याठिकाणी अनेक जिल्ह्यांतील चारशेपेक्षा जास्त जोडप्यांनी दिवसभरात जागरण गोंधळ घातला. जागरण गोंधळ घालण्याची फार वर्षांपूर्वीपासूनची परंपरा असल्याने ती आजही येथील मंदिरात भाविकांनी जोपासली आहे. जागरण गोंधळ घातल्याशिवाय सुख शांती लाभत नसल्याचा भाविक भक्तांचा समज आहे.
येथील मंदिरात दररोज ४० ते ५० जागरण गोंधळ होत आहेत. पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी येथे जवळपास शंभर ते दीडशे जागरण गोंधळ होत असतात. (वार्ताहर)