साडेसोळा हजार क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Published: July 31, 2014 02:17 AM2014-07-31T02:17:01+5:302014-07-31T02:17:01+5:30

शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने मुठा नदीत मंगळवारी मध्य रात्रीपासून मोठ्या प्रमाणात धरणातील पाणी सोडण्यात आले होते.

Around six hundred thousand curves | साडेसोळा हजार क्युसेक्सचा विसर्ग

साडेसोळा हजार क्युसेक्सचा विसर्ग

Next

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने मुठा नदीत मंगळवारी मध्य रात्रीपासून मोठ्या प्रमाणात धरणातील पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे आज पहाटेपासून नदीकाठच्या परिसरात पूरजन्यस्थिती निर्माण झाली होती. धरणातून मध्यरात्री 3 नंतर तब्बल १६ हजार ५४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे सकाळी पाचच्या सुमारास बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला, तर नदीपात्रातील दोन्ही बाजूंचे रस्ते पाण्याखाली गेले होते.
नदीपात्रात पाणी घुसल्यानंतर, या परिसरात रात्रीपासूनच पार्किंग करण्यात आलेली दहा चारचाकी वाहने अडकली होती. आज दुपार पर्यंत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही सर्व वाहने पात्रातून बाहेर काढली.
दरम्यान, आज दुपारी तीननंतर हा विसर्ग १६५५ क्युसेक्स करण्यात आला. त्यामुळे नदीला आलेले पाणी ओसरून नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पूल वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात गेल्या चोवीस तासांपासून मुसळाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे या प्रकल्पातील खडकवासला धरण मंगळवारी तीनच्या सुमारास १०० टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून रात्री आठनंतर नदीत पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार, रात्री आठनंतर मुठा नदीत सुमारे २५६८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यानंतरही धरणात पाऊस सुरूच असल्याने, तसेच पाणीसाठा वाढत असल्याने हा विसर्ग रात्री अकरा वाजता ५ हजार १३६ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर रात्री तीन वाजता हा विसर्ग १६ हजार ८४१ क्युसेक्सने वाढविण्यात आला. हे सोडण्यात आलेले पाणी पहाटेपर्यंत शहरातील नदीपात्रात पोहोचल्याने पहाटे पाचच्या सुमारास डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता.
तसेच, नदीपात्रातील रस्ताही पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने, हा पूल मंगळवारी रात्रीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. तसेच, नदीपात्रातील रस्ता वगळता शहरात नदीकाठी असलेल्या भागात कोठेही पाणी घुसण्याच्या घटना घडल्या नसल्याची माहिती महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Around six hundred thousand curves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.