बनावट टोल पावत्या प्रकरणातील आरोपीला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:23+5:302021-03-08T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेड शिवापूर : खेड शिवापूर टोलनाक्यावरील बोगस पावती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास तत्काळ अटक करा, अन्यथा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेड शिवापूर : खेड शिवापूर टोलनाक्यावरील बोगस पावती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास तत्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा शिवगंगा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. बनावट पावती प्रकरणात दहा दिवस उलटून गेल्यानंतर ही प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.
खेड शिवापूर येथील टोलनाक्याप्रकरणी १० ते १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. तर सात जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित आरोपींना जामीनही मिळाला. मात्र, या गुन्ह्यातील इतर फरार आरोपी व मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच आहेत. मुख्य सूत्रधारांंना तातडीने तपास करून अटक केली नाही, तर खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन छेडू असा इशारा खेड शिवापूरचे सरपंच अमोल रामदास कोंडे यांनी दिला आहे. २६ फेब्रुवारीला खेड शिवापूर टोलनाक्यावर बोगस टोल पावती रॅकेट प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने सजग नागरिकांच्या मदतीने उघड केला होता. मोठी फसवणूक करणाऱ्या या मोठ्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारास का अटक केली जात नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. साधारण रात्रीच्या वेळी या बोगस पावत्या खपविल्या जात होत्या. प्रत्येक टोल कर्मचऱ्यास पंचवीस बोगस पावत्या दिल्या जात होत्या अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे गैरव्यवहार झालेला रुपयांचा समोर आलेला आकडा हा खरा आहे की खोटा ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट
खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार स्वतंत्र तपास होण्यासाठी स्वतंत्र अधिकारी यांची नेमणूक केली आहे, ही आनंदाची बाब आहे. परंतु खरा आनंद मुख्य सूत्रधारास अटक करून कारवाई केल्यावरच मिळेल. टोलनाका हा खेड शिवापूरच्या हद्दीत असल्याने गावाचे नाव खराब होत आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधाराचा छडा लावून लवकरात लवकर अटक करावी. त्याचप्रमाणे मूलभूत सुविधा म्हणजे रस्त्यावर वीज, खड्डे बुजविणे, व जनतेची होणारी लूट थांबवावी, अशा विविध मागण्यांसाठी प्रसंगी आमची उपोषणास बसण्याची तयारी असल्याचे सरपंच अमोल रामदास कोंडे यांनी सांगितले.
चौकट
अजूनही आमचा तपास चालू आहे. संबंधित लोकांचे जबाब घेणे सुरू आहे.
पुणे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आणेवाडी टोलनाक्याचे महसूल व्यवस्थापक, खेड शिवापूर टोलनाक्याचे संपूर्ण ऑडिटर, कर्मचारी, आणि महसूल व्यवस्थापक यांना समन्स पाठवले असून ते उद्या सोमवारी (दि. ८) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
-संदीप घोरपडे (राजगड पोलीस निरीक्षक)