सेवा कर न भरल्याप्रकरणी उद्योजकास अटक, : कायद्यानंतरची शहरातील पहिलीच कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:18 AM2017-10-18T03:18:12+5:302017-10-18T03:18:26+5:30
ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्स विभागाने एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना
पुणे : ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्स विभागाने एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना सोमवारी अटक केली़ त्यांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे़
डीजीजीएसटीआयच्या पुणे क्षेत्रीय युनिटच्या उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी इंटेलिजन्सच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत जीएसटी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीनुसार एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) ही कंपनी विविध सेवा पुरविणारी नोंदणीकृत कंपनी आहे. मनुष्यबळ पुरवठा एजन्सी, भाड्याने चारचाकी वाहन देणे, स्वच्छता सेवा आणि सुरक्षा आणि गुप्तहेर सेवा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.
पुणे शहरात विविध ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत़ कंपनीने विविध सेवा देताना २०१२-१३ ते २०१५ -१६ दरम्यान सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वसूल केला, पण तो शासनाकडे न भरता त्याचा परस्पर अपहार केला़ यापूर्वी त्यांची चौकशी केली असता कंपनीने ३ कोटी ४४ लाख रुपयांची तीच तीच चलने पुन्हा पुन्हा वापरून फसवणूक केल्याचे उघडकीस आले, तसेच भाड्याने वाहन देण्याच्या व्यवसायात १ कोटी ४९ लाख रुपयांच्या चुकीच्या नोंदी केल्याचे आढळून आले आहे़ २०१५ -१६ मध्ये त्यांनी २ कोटी रुपयांचा कमी कर भरल्याचे आढळून आले आहे़ त्यानंतर त्यांच्यावर फायनान्स अॅक्ट, १९९४ च्या कलम ९१ (१) नुसार गुन्हा दाखल करून पाठक यांना सोमवारी बाणेर येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. पाठक यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असली तरी त्यांच्या व्यवहारांची काटेकोर तपासणी केली जात असल्याचे वैशाली पतंगे यांनी सांगितले़
देशभर जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातील कराची रक्कम शासनाकडे भरली जात आहे की नाही, याची तपासणी जीएसटी इंटेलिजन्सकडून केली जात आहे़
त्यात ग्राहकांकडून ज्या दराने सेवा कर वसूल केला गेला, त्याच दराने तो भरला आहे की नाही़ ज्या वस्तूंसाठी जितकी कर आकारणी केली पाहिजे, तितकी केली जात आहे ना, याची तपासणी केली जात आहे़
त्यात दोषी आढळणाºयांवर जीएसटी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे़ सेवा कर न भरणाºयांकडून शासनाबरोबरच ग्राहकांचीही फसवणूक केली जात असल्याचे जीएसटी इंटेलिजन्सकडून सांगण्यात आले़