पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला अटक; चोरीच्या कारमधून आले होते सराईत चोरटे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:51 PM2021-05-12T15:51:20+5:302021-05-12T15:51:32+5:30
उरुळी कांचन येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या होते तयारीत चोरटे...
पुणे : उरुळी कांचन येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या चौघा जणांच्या टोळीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे.
गणेश राजेंद्र शिवडकर (वय २१, रा. आनंदनगर, रामटेकडी), सुनिल प्रकाश गायकवाड (वय २३, रा. रामटेकडी) तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय १९, र. आनंदनगर, रामटेकडी), निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय २४, रा. महम्मदवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार किशोर प्रकाश गायकवाड (रा. मंगळवार पेठ) आणि आकाश गणपत माने (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, कटावणी, कटर, चाकू, कात्री, कात्रीची पाती, मिरची पुड अशी दरोडा टाकण्याची हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील हवालदार उदय सुदाम काळभोर यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १० मे रोजी रात्री उरुळी कांचन परिसरात गस्त घालत असताना डाळींब गावाकडे जाणार्या रस्त्यावरील कॅनॉलच्या कडेला एका कारमध्ये ६ जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केल्यावर त्यातील दोघे जण पळून गेले. पोलिसांनी चौघांना पकडून त्यांच्याकडील हत्यारे जप्त केली आहेत. अधिक चौकशी केली असता महामार्गावरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या हेतूने ते चारचाकी मोटारीतून जात होते. त्यांच्याकडील कार चोरीची असल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.