कोरेगाव-भीमात पोलिसांचे अटकसत्र, आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:45 AM2018-01-09T00:45:32+5:302018-01-09T00:45:49+5:30
कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक घटना आणि वढू बुद्रुक येथे पोलीस उपविभागीय अधिका-यांची गाडी फोडल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक घटना आणि वढू बुद्रुक येथे पोलीस उपविभागीय अधिका-यांची गाडी फोडल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा येथील जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार तसेच वढू बुद्रुक येथे २९ डिसेंबर रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन्ही गटांचे आरोपी आहेत. त्यांना कोरेगाव भीमा, सणसवाडी व कोंढापुरी येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दंगल माजवणे, जाळपोळ, दगडफेक तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे आदी कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. एक स्वतंत्र पथक आरोपींबाबत माहीती घेत आहे. कोरेगाव भीमातील या घटनेच्या तपासासाठी सुमारे चारशे पोलिसांचे बळ तैनात ठेवण्यात आलेले आहे. पोलिसांनी आरोपींच्या नावाबाबत गुप्तता बाळगली आहे.
चौकशीसाठी सांगलीत मोर्चा : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सीबीआयतर्फे चौकशी करावी. दलितांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चात जिल्हाभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी महापौर विवेक कांबळे आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.