पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:17 PM2022-01-25T17:17:18+5:302022-01-26T00:40:46+5:30

झील एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या इंजीनियरिंग, तंत्रनिकेतन, एमबीए, एमसीए कॉलेजमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपये भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने अटक केली

Arrest of Principal Board Member and CA of zeel Education Society Pune | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकासह तिघांना अटक

पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकासह तिघांना अटक

googlenewsNext

पुणे : कामावर नसतानाही बनावट स्टाफ दाखवून त्याआधारे जादा फी मंजूर करुन घेऊन विद्यार्थी व शासनाची ४ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी झील एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी काटकर यांच्यासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

झिल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी मारुती काटकर (वय ६५, रा. हिंगणे खुर्द सिंहगड रोड), झील पॉलिटेक्निकचे तत्कालिन प्राचार्य चंद्रकांत नारायण कुलकर्णी (वय ५८, रा. दत्तनगर, कात्रज) आणि ऑडिटर युवराज विठठल भंडारी (वय ३५, रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झील पॉलिटेक्नीक कॉलेजची फी मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात बनावट अडीचशे स्टाफ नोकरीवर असल्याचे दाखविण्यात आले. त्यांना पगार दिल्याचे दाखवून खोटी पगार पत्रके तयार केली. ती फी मंजूरीसाठी मुंबईतील शुल्क निर्धारण समिती यांना सादर करण्यात आले. त्या आधारे शिक्षण शुल्क समिती कडून फी मंजूर करुन घेत आरोपींनी विद्यार्थ्यांकडून जास्त फीची आकारणी केली. झील एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या झील पॉलिटेक्नीक कॉलेजने २०१५- १६ या शैक्षणिक वर्षात तब्बल ४ कोटी २५ लाख २९ हजार ४८२ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

झिल एज्युकेशन सोसायटीचे अंतर्गत असलेल्या इंजिनिअरींग कॉलेज, एम.बी.ए कॉलेज, एम.सी.ए.कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्येही अनेक वर्षे अशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. या तपासात फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. करण्यात येत आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त विजय पळसुले, पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

असा उघडकीस आला गैरव्यवहार

झील संस्थेचे अध्यक्ष संभाजी काटकर यांच्या तक्रारीवरुन त्यांच्याच संस्थेतील कार्यालयीन अधीक्षक योगेश ढगे याच्याविरुद्ध ९ लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी २०१९ मध्ये अटक केली होती. त्यामुळे ढगे याने संस्थेच्या गैरव्यवहाराचा पोलखोल केला. त्याने विविध तपास संस्थांना सर्व कागदोपत्री पुरावेच सादर केले होते. झील संस्थेच्या एका कॉलेजमधील केवळ एका वर्षातील हा सव्वा चार कोटींचा गैरव्यवहार आहे. त्यांची इतरही काही कॉलेजच आहेत. या गैरव्यवहाराचा मुळातून शोध घेतल्यास तो ४० ते ५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे. झील संस्थेवरील कारवाईनंतर अन्य संस्थांची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतरही शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Arrest of Principal Board Member and CA of zeel Education Society Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.