शैलेश मोहितेला अटक करा, नाहीतर साताऱ्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:12+5:302021-04-28T04:11:12+5:30
--- चाकण : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बदनामी करून पैसे उकळण्यासाठी हनी ट्रॅप कट रचलेल्या प्रकरणातील आरोपी ...
---
चाकण : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बदनामी करून पैसे उकळण्यासाठी हनी ट्रॅप कट रचलेल्या प्रकरणातील आरोपी डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते, माजी नगरसेवक राहुल कांडगे या दोघांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा साताऱ्यात जाऊन पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्या जाधव, सामाजिक कार्यकर्त्या संगीता नाईकरे, चाकण शहर अध्यक्षा स्मिता शहा, पुणे जिल्हा उपाध्यक्षा शोभा शेवकरी, कांचन ढमाले, मनीषा टाकळकर, सीमा साळसकर, खेड कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी उपस्थित होते.
संध्या जाधव म्हणाल्या की, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पदाधिकारी असलेल्या डॉ. शैलेश मोहिते व चाकण नगरपरिषदचा माजी नगरसेवक राहुल कांडगे यांनी सातारा येथील एका तरुणीच्या माध्यमातून षडयंत्र रचले होते. मात्र संबधित तरुणीच्या मनाला पटले नसल्याने तिने त्याचा भांडाफोड केला आहे. तसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधित आरोपींना अटक करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी,
नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी महिला साताऱ्यात जाऊन पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
डॉ. शैलेश मोहिते हे काय करतो ते सर्वाना माहीत आहे. त्याची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. याबाबत वरिष्ठांना निवेदने पाठविली आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मागणीचे निवेदन दिले आहे. असे गुन्हे करणारी व्यक्ती पक्षात नको. कोणीही अशा व्यक्तीला पाठीशी घालू नये. असेही निवेदनात म्हटले आहे.
------------;----------------------------------------
फोटो : २७चाकण मेदनकर प्रेस
फोटो ओळी : शैलेश मोहिते यांना अटक करण्याचा मागणीसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्षा संध्या जाधव, विनायक घुमटकर, सामाजिक कार्यकर्त्या संगीता नाईकरे, चाकण शहर अध्यक्षा स्मिता शहा आदी.