वकील लिम्हण यांच्या हल्लेखोरांच्या सूत्रधाराला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:32+5:302021-06-02T04:10:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : वेल्हा - नसरापूर रस्त्यालगत पारवडी फाट्यावर दि. २४ रोजी पारवडी येथील ॲड. प्रकाश म्हस्कू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : वेल्हा - नसरापूर रस्त्यालगत पारवडी फाट्यावर दि. २४ रोजी पारवडी येथील ॲड. प्रकाश म्हस्कू लिम्हण (वय ५५) यांच्यावर पाच-सहा जणांनी गाडीतून येऊन अचानक हल्ला केला होता. त्यात लिम्हण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ला प्रकरणी येथील खडीमशीन मालक दत्तात्रय मांगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पारवडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. १) राजगड पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले.
पारवडी, ता.भोर येथील माजी सरपंच ॲड. प्रकाश लिम्हण यांच्यावर हल्ला प्रकरणी पाच-सहा तरुणांपैकी चार जणांना राजगड पोलिसांनी हल्ल्यानंतर सोळा तासांच्या आत कोंढणपूर येथे (दि.२५ रोजी) ताब्यात घेतले होते.
मंगळवारी दुपारनंतर पारवडी येथील ग्रामस्थ महिलांसह नसरापूर (ता. भोर) येथे राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून पोलिसांनी हल्ल्यामागे पारवडी येथील खडीमशिन मालक सूत्रधार असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून, लिम्हण यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी पारवडी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
कोट :
या प्रकरणातील आरोपी अटकेत असून त्यांच्याकडून पुरावे मिळत आहेत. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
: संदीप घोरपडे, पोलीस निरीक्षक
राजगड पोलीस ठाणे,नसरापूर
फोटो व ओळ : पारवडी (ता. भोर) ग्रामस्थांच्या वतीने राजगडचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.