कामगाराला मारहाण करून लुटणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:09 AM2021-01-14T04:09:29+5:302021-01-14T04:09:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : इस्त्रीचे कपडे देऊन परत दुचाकीवरून दुकानात जात असलेल्या कामगाराला वाटेत अडवून त्याला मारहाण करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इस्त्रीचे कपडे देऊन परत दुचाकीवरून दुकानात जात असलेल्या कामगाराला वाटेत अडवून त्याला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी १२ तासांच्या आत २ अल्पवयीन मुलांसह गुन्हेगाराला पकडले.
दीपक अंकुश लोणके (वय ३२, रा. साई नगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अखिलेश लवलेश कुमार (वय १८, रा. रुणवाल डायमंड, एनआयबीएम, उंड्री रोड) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अखिलेश हे त्वरिता ड्रायक्लिनरर्स या दुकानात कामाला आहेत. ११ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता ते मँगो वुडस सोसायटीमधील ग्राहकाचे इस्त्री केलेले कपडे घेऊन दुचाकीवरुन गेले होते. कपडे देऊन इस्त्रीसाठी नवे कपडे घेऊन ते दुचाकीकडे येत असताना हिल ग्रीन स्कूलजवळ तिघा जणांनी त्यांना अडवले. लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करून दुचाकीसह त्यांना जमिनीवर पाडले. त्यांच्याकडील ८०० रुपये व मोबाईल व दुचाकी असा ३५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. चोरट्याच्या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपी व दोघा अल्पवयीन मुलांना १२ तासाच्या आत ताब्यात घेतले.