Pune Crime | फसवणूक करून दुबईला पळालेल्या आराेपीच्या मावसभावाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:51 AM2023-03-29T08:51:07+5:302023-03-29T08:51:50+5:30
या प्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्या मावसभावाला अटक केली...
पुणे : फॉरेक्स ट्रेडमध्ये गुंतवणूक करा अन् जादा नफा मिळवा, असे आमिष दाखवून दोघा व्यावसायिकांना अडीच कोटींचा गंडा घालत मुख्य संचालक दुबईला पसार झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्या मावसभावाला अटक केली आहे. विक्रांत रमेश पाटील (वय २५, रा. पलुस, सांगली) असे त्याचे नाव आहे.
संतोषकुमार विष्णू गायकवाड (रा. बनवडी, ता. खानापूर, सांगली) याने बेस्ट पॉइंट ॲम्पॅक्ट जनरल ट्रेडिंग नावाने कंपनी स्थापन केली. त्याने लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून अडीच कोटी रुपये घेतले. त्यानंतर गायकवाड हा दुबईला पळून गेला. चार दिवसांपूर्वी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासात त्यातील काही रक्कम गायकवाड याने त्याचा मावसभाऊ विक्रांत पाटील याच्या खात्यावर स्वीकारल्याचे स्पष्ट झाले होते. पाटील हा वानवडी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला वानवडी येथून पकडले.
विक्रांत पाटील याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, असे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी सांगितले.