छोटा शेख सल्ला दर्गाच्या मिळकतप्रकरणी फसवणूक करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:16+5:302021-03-22T04:10:16+5:30
पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा ट्रस्टच्या मिळकतीच्या विकसनाचे अधिकार स्वत:कडे असल्याचे भासवून ट्रस्टमधील काही व्यक्तीशी संगनमत ...
पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा ट्रस्टच्या मिळकतीच्या विकसनाचे अधिकार स्वत:कडे असल्याचे भासवून ट्रस्टमधील काही व्यक्तीशी संगनमत करून एका कंपनीची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नुकतीच एकाला अटक केली.
अमिन नूर महंमद शेख (रा. जय शिवशंकर सोसायटी, आळंदी रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी ओमेगा प्रिमायसेस प्रा. लि. कंपनीच्या वतीने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अमिन नूर महंमद शेख, सलिम मौला पटेल, नबीलाल मोमीन, फारुख आत्तार, इलियास पशुमनैया सय्यद आणि मुनावर गुलाब खान यांच्याविरुद्ध ४०६, ४९५, ४२० व ३४ अन्वय गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंपनीकडे २००७ मध्ये अमिन नूर महंमद शेख यांनी आपल्याकडे ट्रस्टच्या व्यक्तीचे कुलमुख्यत्यारपत्र असल्याचे सांगितले. या ट्रस्टच्या मिळकती फिर्यादी कंपनीस आवश्यक ती सर्व कामे करून तबदिल करून देण्याचे आश्वासन दिले. वेळोवेळी फिर्यादीकडून सुमारे साडेतीन कोटी रुपये उकळले. मुस्लिम दर्गा, मशीद यांच्या मिळकतीबाबत व्यवहार करायला सर्वाेच्च न्यायालयाने निर्बंध आणले. छोटा शेख सल्ला दर्गा ट्रस्टच्या बाेर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांना मिळकतीसंबंधी विकसित करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. परंतु, फिर्यादी यांना खोट्या भूलथापा मारून कोणतेही मिळकतीचे हक्क व अधिकार न देता खोट्या आश्वासनावर १२ वर्षे खेळवत ठेवले. पैसे परत न देता फसवणूक केली. अखेर कंपनीच्या वतीने २०१८ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी आता याप्रकरणात अमिन शेख याला नुकतीच अटक केली. अशा स्वरुपाचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे.