पुणे रेल्वे स्थानक उडवून लावण्याची धमकी देणारा जेरबंद; गुगल व्हॉईस सर्चवरुन काढला पोलिसांचा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:22 PM2022-06-30T22:22:42+5:302022-06-30T22:23:22+5:30
गुगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून त्यानंतर फोन करुन धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा हा प्रत्यक्षात निरक्षर असून त्याने गुगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून त्यानंतर फोन करुन धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय २२, रा. सध्या सी एस टी फिरस्ता, मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्रभू सूर्यवंशी याने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष् उच्च पदस्थ राजकीय नेते, मोठे उदयोगपती यांना कॉल केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाणे व वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर १३ मे रोजी स्फोटक सदृश्य वस्तू मिळून आल्याने पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना राबवित आहेत. त्यामध्ये १ पोलीस निरीक्षक व ५० पोलीस अंमलदार हे दररोज बंदोबस्तासाठी स्थानकावर नेमले आहेत.
सूर्यवंशी हा निरक्षर आहे. त्याने काही दिवसांपूर्वी चोरलेल्या चोरलेल्या मोबाईलचा वापर करुन हा कॉल केला होता. तो निरक्षर आहे. त्याने गुगल व्हाॅईस सर्च वरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन नंबर शोधला व त्यानंतर फोन करुन हम पूना स्टेशन के पास बॉम्ब रखनेवाले है और आठ दिन मे उडाने वाले है अशी धमकी दिली. हा फोन रेल तिकीट शाम यानाने रजिस्टर होता. लोहमार्ग पोलीस दलाचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस अंमलदार धीरज भोसले, रुपेश पवार, संदीप काटे, दिलीप खोत यांनी त्याचा शोध घेऊन मुंबईतील डोंगरी भागातून त्याला पकडले.
या कॉलमध्ये कोणतीही दहशतवादी संघटना अथवा सामाजिक अराजकता माजवणारे घटक नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याने हे कृत्य केले असून यापूर्वीही त्याने असे कृत्य केल्याचे सांगत आहे. - सदानंद वायसे पाटील, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस