भूत काढण्याच्या नावाखाली तरुणीशी लग्न लावणाऱ्या भोंदूबाबाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 11:10 PM2018-03-28T23:10:40+5:302018-03-28T23:10:40+5:30
उच्च शिक्षित तरुणीशी लग्न करण्यासाठी भूतबाधा घालविण्याचा बनाव रचून मुलीकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग करणा-या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : उच्च शिक्षित तरुणीशी लग्न करण्यासाठी भूतबाधा घालविण्याचा बनाव रचून मुलीकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग करणा-या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. हा खळबळजनक प्रकार घोरपडे पेठ भागात घडला आहे.
राजू अप्पा साळवे (वय ४२, रा. घोरपडे पेठ) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याविरुद्ध विनयभंग करणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली.
याप्रकरणी एका २३ वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ ते २२ मार्च दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजू साळवे हा या तरुणीच्या भावाचा मित्र म्हणून त्यांच्या घरी यापूर्वी वायरमन म्हणून काम करण्यासाठी आला होता. तेव्हापासून तो या तरुणीला ओळखत होता. तरुणीच्या आई मानसिक आजारी आहे. साळवे याने या गोष्टीचा गैरफायदा घेतला. आईला कोणीतरी भूतबाधा केली आहे. ती करणी भूतबाधा काढून या तरुणीच्या अंगात सोडावी लागेल अशा भूलभापा मारल्या. त्यानंतर तिच्या घरात हळदी कुंकाचे रिंगण करून त्यात त्याने या तरुणीला बसविले. उतारा जादूटोणा करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रुपये घेतले. त्यांच्या घरातून उतारा काढून या तरुणीला मांढरदेवी, काळुबाई या देवस्थानचे ठिकाणी २२ मार्चला घेऊन गेला. तेथे तिला हिरवे कपडे घालून सुवासिनी बनवून तिचे देवाशी म्हणजेच त्याच्याशी लग्न लावावे लागेल असे सांगितले. तेथे मी राजू साळवे याचेशी विवाह केला आहे. हा विवाह मांडाबाई, काळुबाई आणि धावजी पाटील यांचे साक्षीने केला आहे. आम्हाला आशीर्वाद द्यावा, असे लिहून घेतले.
त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन तिचा वियनभंग केला. आई आजारातून बरी व्हावी, म्हणून तोपर्यंत तो सांगेल, त्यानुसार ही तरुणी वागत गेली. पण, त्याचा हेतू तिच्या लक्षात आल्यानंतर तिने खडक पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी राजू साळवे याला घरी जाऊन पकडले.
पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील संजय दीक्षित यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीकडून ५ हजार ५०० रुपये हस्तगत करायचे आहेत. त्याने या तरुणीकडून लिहून घेतलेली चिठ्ठी व दीड हजार रुपये मिळाले आहेत. काळुबाईला जाण्यासाठी मित्राच्या रिक्षाचा वापर केला. त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध आहे का याचा तपास करायचा आहे. त्याने आणखी काही महिलांना अशाप्रकारे फसविले आहे याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.