Pune Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला संपवायला निघालेल्या पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:33 PM2022-10-04T20:33:15+5:302022-10-04T20:33:31+5:30
पत्नीस जीवे मारण्यासाठी निघालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली...
लोणी काळभोर (पुणे) : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस जीवे मारण्यासाठी निघालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. आकाश बिभीषण घुले (वय २९, फुरसुंगी मूळ रा. माळीगल्ली,वाशी) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण म्हणाले, पुणे शहरात शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश भंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश आहेत. यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पेट्रोलिंगचे आदेश दिले असून पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करतात.
याचदरम्यान पोलीस शिपाई वीर यांना बातमीदारामार्फत एक व्यक्ती कोयता हातात घेऊन लोणी स्टेशन चौकात थांबलेला असल्याची माहिती मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवली. त्यांनी खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, पोलीस राजेश दराडे बाजीराव वीर, नितेश पुंदे, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने या ठिकाणी पोहोचले व संशयिताला ताब्यात घेतले.
आकाश घुले असे त्याचे नाव होते. त्याची झडती घेतली असता कमरेला धारधार लोखंडी कोयता आढळून आला. अधिक चौकशीत त्यांचे पत्नीस चारित्र्याचे संशयावरून तिचा खून करण्यासाठी मंचरला निघाला असल्याचे त्याने कबूल केले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सतर्कतेमुळे आरोपी यांचे हातून घडणारा पुढील अनर्थ टळला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नितीन गायकवाड करीत आहे.