खुनाच्या प्रकरणात अटक; पण जिद्द सोडली नाही, पोलीस बंदोबस्तात पुन्हा दिली राज्य सेवेची पूर्वपरीक्षा
By नम्रता फडणीस | Published: December 2, 2024 05:55 PM2024-12-02T17:55:01+5:302024-12-02T17:55:28+5:30
एखाद्या शासकीय पदावर काम करण्याची त्याची इच्छा.., मात्र खुनाच्या एका प्रकरणात तो अडकला.., पण अजूनही जिद्द न सोडता दिली राज्य सेवेची पूर्वपरीक्षा
पुणे : तो कला शाखेचा पदवीधर. आजवर त्याने पोलिस कॉन्स्टेबल (एसआरपीफ), सिक्युरिटी सर्व्हिसेस, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर यांसह विविध परीक्षा दिल्या. एखाद्या शासकीय पदावर काम करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, खुनाच्या एका प्रकरणात तो अडकला. त्याला अटक झाली आणि पीएसआय पदासाठीच्या मुलाखतीला तो हुकला. खुनाच्या आरोपाखाली तो पाच महिन्यांपासून येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. पण, अजूनही त्याने जिद्द सोडलेली नाही. त्याला राज्य सेवेची पूर्व परीक्षा द्यायची होती. त्याचा जामीन अर्ज प्रलंबित होता. मात्र, सुनावणीच झाली नाही. म्हणून जुन्नरच्या न्यायालयाने त्याची जिद्द बघून त्याला परीक्षा देण्याचा आदेश पारित केला अन् त्याने रविवारी ( दि. १) वाघोली येथील परीक्षा केंद्रावर जाऊन पोलिस बंदोबस्तात परीक्षा दिली.
जितेंद्र पांडुरंग घोलप याच्यावर ओतूर पोलिस ठाण्यात एका २० वर्षीय मुलाच्या हत्येचा आरोप आहे. मयत मुलाच्या वडिलांनी ३ ऑगस्ट रोजी मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ओतूर पोलिसांच्या तपासात आरोपी आणि मयत मुलामध्ये दि. १ ऑगस्ट रोजी वारंवार कॉल झाल्याचे सीडीआर, टॉवर लोकेशन आणि कबुली जवाब या गोष्टींच्या आधारे पोलिसांनी आरोपी आणि सहआरोपी यांना पकडले. मयताचा मृतदेह देखील आढळून आल्याने आणि इतर जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी तपासात नमूद केले आहे. या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी ऑगस्ट २०२४ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी आहे. या प्रकरणाबद्दल त्याचा जमीन अर्ज राजगुरुनगर सत्र न्यायालयात प्रलंबित होता; परंतु सुनावणी झाली नाही, म्हणून जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अनंत एच. बाजड यांनी त्याला पोलिस बंदोबस्तात परीक्षा केंद्रमध्ये घेऊन जाण्यासाठी दि ३० नोव्हेंबर रोजी आदेश पारित केला होता. आरोपी जितेंद्र याने वाघोली येथील परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तात जाऊन परीक्षा दिली असल्याची माहिती आरोपीचे वकील सुशांत तायडे यांनी दिली. आरोपीचे न्यायालयीन कामकाज सुशांत तायडे यांच्यासह दिनेश जाधव, जीतू जोशी, प्रज्ञा कांबळे, शुभांगी देवकुळे आणि अक्षय घोलप बघत आहेत.