विवाहासाठी मारहाण करून विनयभंग करणाऱ्यास अटक
By admin | Published: June 16, 2015 12:34 AM2015-06-16T00:34:02+5:302015-06-16T00:34:02+5:30
अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तिच्याबरोबर जबरदस्ती करुन मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी बारामती शहर
बारामती : अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तिच्याबरोबर जबरदस्ती करुन मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आरोपी लक्ष्मण ऊर्फ विकी कदम (रा. मेडद, ता. बारामती) याला अटक केली. सोशल मीडियावरून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
पिडीत मुलीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन मुलगी केडगाव (ता. दौंड) येथील रहिवाशी आहे. आरोपी लक्ष्मण उर्फ विकी कदम याने पिडीत मुलीला गेली एक वर्षापासून तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. या मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेवून आरोपींनी तिचा विनयभंग केला. तसेच, तिला मारहाण केली. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ विकी कदम याच्या विरुद्ध पोलिसांनी भा.द.वि. कलम ३२३ स ३४२ (३४) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला सोमवारी रात्री अटक केली. स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. लग्न टाळण्यासाठी पिडित मुलगी केडगाववरून दोन दिवसांपूर्वी बारामतीत रेल्वेने पोहोचली. तिने या कार्यकर्त्यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.