Pune Crime: अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:48 PM2023-08-08T17:48:25+5:302023-08-08T17:55:18+5:30
खुनाच्या प्रयत्नांनंतर ते पळून गेले होते...
सहकार नगर (पुणे) : सिंहगड रास्ता परिसरातील पानमळा वसाहत येथील एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबाबत पाच जणांना अटक करण्यात आली. अरुण रोहिदास चंदनशिवे, अशोक रोहिदास चंदनशिवे, विकी कुमार चंदनशिवे उर्फ राज (तिघे जण रा. धायरी), कुणाल कृष्णा सावंत (रा. नऱ्हेगाव), प्रसिक उर्फ रणजित उत्तम कांबळे (रा. पानमळा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिढीत मुलाच्या मामाचा दहा वर्षांपूर्वी खून झाला होता. त्यातील आरोपी अशोक व अरुण चंदनशिवे यांची सुमारे सहा वर्षांपूर्वी निर्दोष सुटका झाली होती. त्यामुळे त्याचा राग असल्याने तो चंदनशिवे यांच्या नातेवाइकांच्या त्रास देत असल्याचा समज होता. त्यामुळे चंदनशिवे, कांबळे सावंत यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. खुनाच्या प्रयत्नांनंतर ते पळून गेले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. ते पाचही जण पुणे-सातारा रोड लक्ष्मीनारायण टॉकिज शेजारील उड्डानपुलाखाली पर्वतीदर्शन येथील सार्वजनिक पार्किंगमध्ये कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, पो. हवा. कुंदन शिंदे, पो. अं. प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे-पाटील, नवनाथ भोसले प्रमोद भोसले, प्रशांत शिंदे, अनिस तांबोळी, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अमित चिव्हे व अमोल दबडे यांनी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.