राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:45+5:302021-05-07T04:10:45+5:30
पुणे : राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. ...
पुणे : राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. भिलारेवाडी, मूळ गाव राजेगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
याप्रकरणी आकाश चंद्रकांत शिंदे (वय २४, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून वेगवेगळ्या डिजिटल माध्यमावर कोणी आक्षेपार्ह काही पोस्ट टाकल्यास त्यांची दखल घेऊन त्याचा तपास विविध जिल्ह्यांतील पोलिसांकडे सोपविला जातो. पुणे शहर सायबर पोलिसांकडे अशा काही प्रकरणांचा तपास सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींवर फेसबुक ग्रुप, इंटेलेक्चुअल फोरम नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप, कोमट बॉईज अँड गर्ल फेसबुक ग्र्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, फेसबुक ग्रुप, इन्स्टाग्राम व ट्वीटर या समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मेसेज टाकण्यात आले आहेत. समाजातील वर्गावर्गात शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार अशा प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या लौकिकास बाधा आणण्याकरिता त्यांचे फोटो मॉर्फ करून तसेच घाणेरड्या व अश्लील अशा पोस्ट टाकून बदनामी केली. ब्राह्मण व ब्राह्मणेतर जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्या.
वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव इतर समाजमाध्यम वापरकर्ते यांचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके अधिक तपास करीत आहेत. आरोपी भोसले यास ८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.