सोने घेऊन पसार झालेल्यास सिकंदराबादहून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:11 AM2020-12-06T04:11:42+5:302020-12-06T04:11:42+5:30
पुणे : दागिने तयार करण्यासाठी दिलेले सोने घेऊन पसार झालेल्या कारागिराला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सिकंदराबाद येथून ...
पुणे : दागिने तयार करण्यासाठी दिलेले सोने घेऊन पसार झालेल्या कारागिराला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सिकंदराबाद येथून अटक केली. अकबर अली ऊर्फ अख्तर अली रफिक मल्लीक अली (वय ३६, रा. कलासिगुडा, सिकंराबाद) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १६ लाख १५ हजार रुपयांचे ३२३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे युनिट २ चे पथक फरासखाना पोलीस ठाण्यातील फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास करीत होते. पोलीस कर्मचारी गजानन सोनुने व कादीर शेख यांना माहिती मिळाली की, सोने घेऊन फरार झालेला कारागीर हा सिकंदराबाद येथे आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे यांच्या पथकाने सिकंदराबाद येथे जाऊन अकबर अली याला ताब्यात घेतले.
तपास एका गुन्ह्याचा उघडकीस आला दुसराच गुन्हा
अकबर अली याला पुण्यात आणून चौकशी केल्यावर फरासखाना पोलीस ठाण्याच्या ज्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली त्यामध्ये त्याचा काहीएक सहभाग नसल्याचे आढळून आले. मात्र, पोलिसांना आपल्या खबर्यावर विश्वास होता. त्यांनी आणखी खोदून चौकशी केल्यावर त्याने आपण पुण्यातील नाही तर सातारा येथील अभिजित घोडके, तसेच मुनीर शेख, हफिजुल शेख व दिनानाथ धारा यांच्याकडून सोन्याचे दागिने बनवून देण्यासाठी सोने घेतले होते. परंतु दागिने बनवून न देता पळून गेलो होतो, असे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी घोडके यांना बोलावून घेऊन घेतले. घोडके यांनी अकबर अली याला रविवार पेठेतील दुकानात मार्च २०२० मध्ये दागिने बनविण्यासाठी स्वत: २ सोन्याची बिस्कीटे व एक सोन्याच्या बिस्कीटाचा तुकडा असे २२० ग्रॅम सोने, तसेच त्यांचे परिचयाचे मुनीर शेख यांनी १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चोख गोळी, हफिजुल रेहमान शेख यांनी ७० ग्रॅम वजनाची मोहनमाळ मणी व दिनानाथ धारा यांनी १५ ग्रॅम वजनाची गोळी असा सर्व १६ लाख १५ हजार रुपयांचे ३२३ ग्रॅम सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. त्याची फिर्याद फरासखाना पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपासासाठी अकबर अली याचा फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
..........
अकबर अली याने सोन्याचे दागिने तयार करून देतो म्हणून अनेकांकडून सोने घेतले होते. मात्र दागिने तयार करून न देता त्याने पळ काढला. अनेकदा संपर्क करून देखील तो गुंगारा देत होता. इतरांची आरोपीने फसवणूक केल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी गुन्हे शाखा युनिट २ शी संपर्क साधावा
महेंद्र जगताप,
पोलिस निरीक्षक युनिट 2