सांबराची शिंगे विक्रीसाठी आलेल्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:33+5:302021-05-23T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ण वाढ झालेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ण वाढ झालेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे साडेतीन फुटाची ३ शिंगे जप्त करण्यात आली आहे. प्रवीण दिलीप शिंदे (वय २७, रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
युनिट ६ चे पथक शुक्रवारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना तस्करी केलेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी एक जण फुलगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सूचनेनुसार फुलगाव चौक फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून पोते घेऊन आलेल्या तरुणाला अडविले. त्याच्याकडील पोत्याची तपासणी केल्यावर त्यात सांबाराची शिंगे आढळून आली.
याबाबत पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले की, वन विभागाच्या कर्मचार्यांनी ही शिंगे पाहून ती अस्सल असून पूर्ण वाढ झालेल्या सांबर जातीच्या हरणाची आहेत. ही शिंगे सुमारे साडतीन फूट लांब असून अमूल्य आहेत. आरोपी हा पूर्वी मुंबईत कामाला होता. सध्या गावालाच रहात असून बेरोजगार आहे. आपल्याला एकाने दिल्याचे तो सांगतो.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे व करण ढंगारे यांनी ही कामगिरी केली.