"या रस्त्याने तू जायचे नाही कापून टाकीन", कोयता घेऊन धावणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2023 12:08 PM2023-08-09T12:08:35+5:302023-08-09T12:08:52+5:30
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक
चाकण : कापून टाकीन असे म्हणत हातात कोयता घेऊन मारण्यास धावणाऱ्या एक जणास मोई ( ता.खेड ) येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
याप्रकरणी प्रसाद नवनाथ गवारी (वय १९, रा. मोई, ता. खेड) या तरुणाने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विठोबा निवृत्ती गवारी (वय ६२, रा. मोई) याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई ( ता.खरड) येथे सोमवारी (दि.७ ) रोजी दुपारी तीनच्या सुमारास प्रसाद दुचाकीवरून मोई गावातून दत्तनगर येथे जात होता. त्यावेळी आरोपी विठोबा गवारी त्याने फिर्यादीस अडवले व शिवीगाळ केली. "या रस्त्याने तू जायचे नाही" असे म्हणून आरोपी हातातील कोयता घेऊन फिर्यादीस "कापून टाकीन" अशी धमकीही दिली. आरोपीने फिर्यादी याच्यासह चुलते कुंडलिक गवारी व महेश येळवंडे या दोघांनाही विनाकारण शिवीगाळ करून त्यांनाही कोयत्याने कापून टाकीन अशी धमकी दिली.