अटक टळली; १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करा, सर्वोच्च न्यायालयाचे डीएसकेंना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:06 PM2017-12-22T15:06:52+5:302017-12-22T15:11:37+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची अटक टळली आहे.
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची अटक टळली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. इतर राज्यात त्यांचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात डीएसकेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत सर्व रक्कम जमा करण्यात येईल. कोणाचाही एक रुपयादेखील आम्ही ठेवणार नाही. तसेच, कोणाचीही फसवणूक होणार नाही. न्यायालयाने आमचे म्हणणे ग्राह्य धरून मुदत वाढवून देवून आमच्यावर विश्वास दाखविला आहे. आता सर्व गोष्टी व्यवस्थित होतील व व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल, अशी प्रतिक्रिया डीएसके यांच्याकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत डीएसकेंनी गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच त्यांचे विविध बांधकाम प्रकल्पांची कामे ठप्प आहेत. अनेक सदनिकाधाकांना त्यांनी सदनिकांचा ताबा दिलेला नाही. काही प्रकल्पातील मजलेच तयार नाहीत. मात्र, ग्राहकांना बँकेचे हफ्ते देखील सुरु झाले आहेत. अशा ग्राहकांनी देखील त्यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.