भादलवाडी तलावावर चित्रबलाक पक्षांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:55+5:302021-01-10T04:09:55+5:30
चित्रबलाक, भोरड्या, राखी बगळे (ग्रे-हेरॉन), बगळे आदी हजारोंच्या संख्येने असलेल्या या पक्षांमुळे तलाव परिसर चांगलाच गजबजून गेला आहे. ...
चित्रबलाक, भोरड्या, राखी बगळे (ग्रे-हेरॉन), बगळे आदी हजारोंच्या संख्येने असलेल्या या पक्षांमुळे तलाव परिसर चांगलाच गजबजून गेला आहे.
चित्रबलाक पक्षामुळे याठिकाणी पक्षांचा सुरू असलेला किलबिलाट आणखी वाढला आहे. दरवर्षी प्रमाणे येथे विणीच्या हंगामासाठी (अंडी घालण्याचा काळ) येणारा हा पक्षी इतर पक्षांच्या तुलनेत हा पक्षी मोठा व जास्तीच्या संख्येने असल्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे विणीच्या हंगामाठी पक्षांनी हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. उजनीच्या पाण्यातून मिळणारे अन्न, तलावात असणाऱ्या पाण्यातून मिळणारे माशांचे भक्क्ष व दाट काटेरी झाडे राहण्यासाठी सुरक्षित वाटत असल्याने चित्रबलाक पक्षांबरोबरच इतर पक्षांनीही आपली घरटी येथे थाटली आहेत. काही पक्षांनी तलावातील वनस्पतीवर घरटी थाटल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी तलावातील दाट बाभळीच्या पाणी नसल्याने पक्षांनी आपला मुक्काम उंच झाडावर केला होता. मात्र झाडाखाली पाणी असल्याने पक्षांनी घरटी थाटण्यास सुरुवात केली आहे. सध्या येथे घरटी विणण्यासाठी आपल्या चोचीच्या सहाय्याने छोट्या काडया वाहून नेणारे पक्षीही पाहायला मिळत आहेत. घरातील भाग मऊ, उबदार व्हावा यासाठीदेखील पक्षी तलावालगतच्या वनस्पतींचा पाला पक्षी चोचीतून वाहून नेत असल्याची लगभग सुरु आहे.
गेल्या काही वर्षांपासून चित्रबलाक हे पक्षी विणीच्या हंगामासाठी भादलवाडी येथील ब्रिटीशकालीन तलावावर येत असतात. विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या चित्रबलाक पक्षांचे येथील सारंगार देशातील मोठ्या सारंगारापैकी एक आहे. चित्रबलाक पक्षांबरोबर इतर अनेक प्रजातींच्या पक्षांनी याठिकाणी हजेरी लावली आहे. पाच- सहा महिन्यांच्या कालावधीत हे पक्षी आपला विणीचा हंगाम उरकतील. आपल्या चिमुकल्या पिल्लांच्या पखांमध्ये बळ निर्माण करून आपल्या मायदेशी परतील व येथून पुन्हा स्थलांतरीत होतील. मात्र दरम्यानच्या काळामध्ये या पक्षांचे वास्तव्याने किलबिलाट केलेला तलाव मात्र पक्षीप्रेमींसाठी मोठी पर्वणीच असणार आहे.
चौकट : चित्रबलाक पक्षांना हानी होण्याची शक्यता
सध्या काटेरी झुडपाखालील पाण्याची पातळी कमी झाल्याने शिकाऱ्यापासून या पक्षांना धोका असून त्याचप्रमाणे जनावरे राखणाऱ्या माणसांकडून पक्षांना हानी होवू शकते आहे. सध्या विणीच्या हंगामासाठी सुरुवात होत असून याठिकाणी असलेले खाद्य व सुरक्षित ठिकाणे यामुळे पक्षी येतात मात्र हौशी पर्यटकांकडून अनेकदा त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला जातो त्यावर आवर घालणे आवश्यक आहे.
-
रामकृष्ण येकाळे, पक्षी अभ्यासक
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील उजनी जलाशयावर दाखल झालेले चित्रबलाक पक्षी