पालखी आणि फुलांच्या रथातून झाले मानाच्या गणपतींचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 08:42 PM2019-09-02T20:42:25+5:302019-09-02T20:45:27+5:30

भव्य मिरवणुका काढत पुण्यातील मानाचे पाचही गणपती मंडळांमध्ये विराजमान झाले.

arrival of manache ganpati | पालखी आणि फुलांच्या रथातून झाले मानाच्या गणपतींचे आगमन

पालखी आणि फुलांच्या रथातून झाले मानाच्या गणपतींचे आगमन

googlenewsNext

पुणे: गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरयाच्या जयघोषात चांदीची पालखी आणि आकर्षक फुलांच्या रथातून मानांच्या पाचही गणपतींचे आगमन झाले. ढोल पथकांच्या निनादात सकाळी आठ वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. नववारी साड्या नेसलेल्या महिला, फेटे, सलवार कुर्ता असा पारंपरिक वेशभूषा प्रदान करणारे पुरुष, लहान मुले मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल ताशा पथकांमध्येही तरुणी-तरुणींचा उत्साह दिसून येत होता.
 
मानाचा पहिला कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू झाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचा विजय असो, अशा जयघोषात कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला सुरुवात केली. पालखीबरोबर अब्दागिरी घेऊन जाणारे मावळे आणि छत्री घेऊन जाणारा सेवक होता. या मिरवणुकीत श्रीराम आणि संघर्ष ढोल ताशा पथकांनी निरनिराळ्या तालावर ढोल ताशा निनादाचे सादरीकरण केले. 

मानाचा दुसरा तांबडी जाेगेश्वरी गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. सकाळी १०.३० वाजता शंख निनादाने मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी घातल्या होत्या. शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बॅण्ड मिरवणुकीत सहभाग झाले होते. दुपारी १ वाजता उत्सवमंडपात श्रींची प्राणप्रतिष्ठा इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बाल आणि धारिवाल समूहाच्या अध्यक्ष जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आली. 

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक रंगबेरंगी फुलांच्या रथातून काढण्यात आली. मिरवणुकीत नादब्रम्ह, गर्जना, समर्थ प्रतिष्ठान, गुरुजी प्रतिष्ठान या पथकांसह यावर्षी प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांचे पथक मिरवणुकीत सहभागी झाले. तीस कैदी बांधवांच्या पथकात २८ ढोलवादक आणि २ ताशा वादक होते. गणेशोत्सवाच्या २५ दिवस अगोदर या कैद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. इतिहासात प्रथम असे कैद्यांनी मानाच्या गणपतीसमोर ढोल ताशा वादन केले आहे. उद्योगपती विशाल व श्‍वेता चोरडिया यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ रथामधील गणरायाची उंच मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली. मिरवणुकीत वाद्यवृंद, भद्राय आणि श्री रविशंकर शाळेचे ढोल-ताशा पथक यांच्या वाद्यांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४५  मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा या पथक सहभागी झाले होते. पारंपरिक लाकडी पालखीतून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली.  दुपारी १२ वाजून ३० वाजता "केसरी'चे विश्‍वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Web Title: arrival of manache ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.