Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा अन् तुकोबांचे आज पुण्यात आगमन; स्वागतासाठी पुणेकर सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:35 IST2023-06-12T10:35:02+5:302023-06-12T10:35:45+5:30
पुण्यातील पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार

Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा अन् तुकोबांचे आज पुण्यात आगमन; स्वागतासाठी पुणेकर सज्ज
पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. हा साेहळा साेमवारी पुण्यात येणार असल्याने पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
वेशीवर हाेणार स्वागत
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सकाळी ११:३० वाजता आळंदी रस्त्यावरील कळस क्षेत्रीय कार्यालय येथे आगमन होणार आहे.
- श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुंबई- पुणे रस्त्यावरील बोपोडी सिग्नल चौक येथे दुपारी १ वाजता आगमन होणार आहे.
- पुणेकरांच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे दोन्ही पालखीचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर १४ जूनला पालखी साेहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
अशी पुरवली जाईल सेवा
- शहरात दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असल्याने क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार, पहिल्या व दुसऱ्या दिवशी प्रत्येकी १ हजार २९० फिरते शौचालय आणि तिसऱ्या दिवशी ५१३ फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहेत.
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अन्य ठिकाणी जेंटिग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- वारकरी मुक्कामास असलेल्या शाळांमध्ये महिला वारकऱ्यांसाठी न्हाणी घराची सोय आणि सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन्सची व्यवस्था केलेली आहे.
- मुक्कामाच्या निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिरात स्वतंत्र महिला कक्ष स्थापन करून मोफत स्वरूपात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- आरोग्य विभागामार्फत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पालखी मार्गावर सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता केली जाते.
- रस्त्यावर मोकाट जनावरे आणि भटके कुत्रे फिरणार नाहीत याकरिता कोंडवाडा विभाग व आरोग्य विभागामार्फत योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
- पालखी मार्गावर टँकर आणि विविध ठिकाणी पाण्यासाठी स्टॅन्ड पोस्टदेखील उभे करण्यात येत आहे.
- पालखीच्या पुण्यातील वास्तव्यादरम्यान भवानी पेठ आणि नाना पेठ तसेच पालखी मार्गाच्या परिसरात मनपाच्या वास्तूंमध्ये वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. पाणीपुरवठादेखील सुरळीत ठेवण्यात येणार आहे.