माऊली माऊली! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांचे आळंदीत आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:05 PM2022-06-19T15:05:04+5:302022-06-19T15:05:16+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत आळंदीत किमान ४ लाखांहून अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व प्रशासनाच्या वतीने पायी वारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कोविड काळानंतर दोन वर्षांनी आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा विना अटींमध्ये साजरा केला जाणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये वारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या २१ जूनला आळंदीतून माउलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान होईल. दरम्यान आळंदीत वारीसाठी वारकरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आषाढी पायी वारीसाठी आलेले भाविक आळंदीत दाखल झाल्यानंतर पवित्र इंद्रायणीचे दर्शन घेत आहेत. तर अनेक वारकरी प्रस्थान सोहळ्यापूर्वी दोन दिवस मुक्कामासाठी तंबू ठोकताना दिसत आहेत.
इंद्रायणीनगर येथील पदपथ, सिद्धबेट येथील वृक्षांच्या सावलीत भाविक विश्रांती घेताना दिसत आहेत. अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शनासोबत माउलींच्या जीवनकार्याशी संबंधित असलेल्या सिद्धबेट, संत ज्ञानेश्वर यांनी चालवलेली भिंत, विश्रांतवड अशा गावातील ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेत आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक पुस्तके, हार, फुले प्रसाद, कपडे अशा साहित्यांची दुकाने सजू लागली आहेत. वारीसाठी आलेले छोटे-मोठे व्यावसायिक विविध ठिकाणी दुकाने थाटत आहेत. तर माउलींची महती सांगणारे वासुदेव दाखल होत आहेत.