‘मंगलमूर्ती मोरया’च्या जल्लोषात ‘श्रीं’चे घरोघरी आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:54+5:302021-09-11T04:12:54+5:30
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात शुक्रवारी घरोघरी ‘श्रीं’चे आगमन झाले. कोरोनामुळे पसरलेल्या नैराश्यमयी वातावरणात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने उत्साह ...
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात शुक्रवारी घरोघरी ‘श्रीं’चे आगमन झाले. कोरोनामुळे पसरलेल्या नैराश्यमयी वातावरणात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने उत्साह आणि आनंदाचे रंग भरले. आकर्षक रंगावली. फुलांची आरास, लाईटिंगच्या माळा, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा घरोघरी विराजमान झाला. ‘मोदक मिठाईच्या गोडव्याने बाप्पाच्या आगमानाचा आनंद द्विगुणित झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असले तरी कुटुंबांमधला उत्साह कमी झालेला नव्हता. गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गणेश मूर्तींच्या स्टॉलवर भाविकांची गर्दी झाली होती. मध्यवर्ती पेठांसह, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता व उपनगरच्या भागात ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत बाप्पाला घरी नेताना सहकुटुंब पारंपरिक वेशभूषेत दिसून आली. कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीत, कोणी रिक्षात, तर कोणी टेम्पोत बाप्पाला उत्साहाने घरी घेऊन जाताना दिसत होते. काहींनी पारंपरिक वेशभूषेत जयघोष करत बाप्पाला घरी नेले.
घराघरांमध्ये सकाळपासून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती. महिलावर्ग नैवेद्यासाठी मोदक करण्याच्या तयारीत मग्न होता. सकाळी आठपासून ते चार वाजेपर्यंत शहरात ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जल्लोष सुरू होता. घरोघरी ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करून आरती आणि नैवेद्य दाखविण्यात आला. अनेकांनी बाप्पाच्या आगमनाची क्षणचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. बाप्पाच्या आगमानाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करण्यात आले तर व्हॉट्सॲपवर घरगुती बाप्पाची आणि सजावटीची छायाचित्रे अनेकांनी पोस्ट करत आनंद द्विगुणित केला. तर घरगुती गणपतीसोबतचा खास सेल्फीही तरुणाईने शेअर केला अन् त्यावर लाईकचा वर्षावही झाला.
---------
चौकट
उद्या (दि.११) दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.
घराच्या घरी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरिता पुणे महापालिकेने एकूण २०० मे.टन अमोनियम बायकाबोर्नेट सर्व क्षेत्रिय कार्यालयांव्दारे, प्रत्येक आरोग्य कोठ्यांच्या ठिकाणी आणि गणेश मंडळाच्या ठिकाणी नागरिकांना मोफत वाटप केले जाणार आहे़ तसेच शहरात २४७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्या नागरिकांना घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दीडशेपेक्षा जास्त मूर्ती विसर्जन रथ अर्थात फिरत्या हौदांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.