वरुणराजाच्या अभिषेकात सोहळ्याचे पुण्यनगरीत आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 01:10 AM2018-07-08T01:10:48+5:302018-07-08T01:51:07+5:30

ध्यास एक, आस एक, अट्टहास एक. मैलोन् मैल प्रवास करून पूर्णत्वाचे प्रतीक असणाऱ्या लाडक्या विठूरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्या.

 Arrival of Varunaraja on the occasion of the ceremony | वरुणराजाच्या अभिषेकात सोहळ्याचे पुण्यनगरीत आगमन

वरुणराजाच्या अभिषेकात सोहळ्याचे पुण्यनगरीत आगमन

Next

पुणे - ध्यास एक, आस एक, अट्टहास एक. मैलोन् मैल प्रवास करून पूर्णत्वाचे प्रतीक असणाऱ्या लाडक्या विठूरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्या. वरुणराजानेदेखील वारकरी बांधवांवर मेघधारांचा अभिषेक करून अवघे वातावरण विठ्ठलमय करून टाकले. आकुर्डीहून निघालेल्या संत तुकाराममहाराज आणि आळंदीतून प्रस्थान केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सायंकाळी पुण्यात आगमन झाले. सकाळपासूनच दोन्ही पालख्यांच्या स्वागताची तयारी उत्साहात सुरू होती. पालिका प्रशासन, स्थानिक मंडळे, आघाडीवर होती.
पालखीसोहळा सायंकाळी पोहोचण्याच्या आधीच वारकºयांचे जथ्थे सकाळपासूनच पुण्याच्या दिशेने येत होते. भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. पुणेकर नागरिक मोठ्या भक्तिभावाने त्यांचे स्वागत करत होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास संत तुकाराममहाराज यांची पालखी शहरात दाखल झाली. जय जय रामकृष्णहरीचा निरंतर जप, जोडीला टाळमृदंग, त्याच्या तालावर डोलणारी पावले हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्यने गर्दी केली होती. संत तुकारामांचा चांदीचा रथ लक्ष वेधून घेत होता. मन प्रसन्न करणारी फुलांची आकर्षक सजावट, त्यावर केलेली विद्युतरोषणाई, हे सारे आपल्या कॅमेºयात टिपण्यासाठी गर्दी दाटलेली दिसून आली. ऊन, वारा, पाऊस याची जराही तमा न बाळगता पांडुरंगाच्या दर्शनाचे लागलेले वेध वारकरी बांधवांच्या चेह-यावर होते. यात आपण कित्येक मैल अंतर चालून आलो आहोत आणि यापुढे शेकडो मैलाचे अंतर पार करायचे आहे याचा थकवा ना ओझे त्यांच्या चेह-यावर होते. विठूनामाचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला या उक्तीप्रमाणे त्यांची पावले झपाझप आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पडत होती. वारीत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते. इथे ना कुणी उच नीच सगळे विठोबाचे भक्त याप्रमाणे हाती टाळ घेत, ज्ञानोबा तुकोबांचे नाम त्यांच्या मुखात होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भक्तांची संख्या मोठी असल्याचे पाहावयास मिळाले. वारकरी बांधवांनी दाटलेला संचेती पूल याची प्रचिती देत होता.

वारक-यांच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या
संत ज्ञानेश्वर यांची पालखी थोड्या उशिराने शहरात दाखल झाली. सायंकाळी सव्वा सात वाजता माऊलींच्या पालखीने शहरात प्रवेश केला. पालखी दाखल होताच पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माऊलींच्या नामाचा गजर करत वारकरी बांधव अखंड नामस्मरणात रंगून गेल्याचे दृश्य लक्ष वेधून घेत होते. पालखी सोहळ्यात सहभागी वारकºयांच्या स्वागतासाठी पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग

‘ज्ञानोबामाऊली- तुकोबारायां’चा चाललेला अखंड जयघोष, त्या जयघोषात बेभान होऊन विठ्ठलनामाच्या आळवणीत पुण्यनगरीचा परिसर पंढरीमय
होऊन गेला. कुणीही यावे त्या नामस्मरणात सहभागी व्हावे, भक्तिमय होऊन जावे असे दृश्य ‘याचि
देही, याचि डोळा’ पुणेकरांनी अनुभवला. ‘होय होय वारकरी,
पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेचि येणे’ याचा प्रत्ययदेखील संत ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांचा पालखीसोहळा पुण्यात आल्यानंतर आला.
पालखी येण्यापूर्वी काही काळ पावसाने भाविकांना आपल्या सरींनी चिंब केले; मात्र यामुळे त्यांच्या उत्साहात कुठेही कमतरता नव्हती. याउलट पावसाच्या सरी अंगावर घेत मोठ्या आनंदाने ज्ञानोबा तुकाराम, जय जय रामकृष्णहरी, बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्रीनामदेव तुकारामांचा गजर सुरूच होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ वारकरी यांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांनी घातलेल्या फुगड्या बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हाती टाळ, कपाळी केशरी गंध आणि डोक्यावर टोपी अशा वेशभूषेत ते चिमुकले वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा आळवलेला स्वर उपस्थितांची दाद मिळवून गेला. वारकरी बांधवांचा पाहुणचार करण्यात पुणेकरांची अगत्यशीलता जागोजागी पाहावयास मिळत होती.

वारकरीबंधुंनी शहर ज्ञानोबा-तुकोबांच्या गजराने भारावून टाकले, त्यात शहरातील तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. नेहमीप्रमाणे या वेळीदेखील टाळक री, वीणाधारक, एवढेच काय तर चोपदार, भालेदार, रथासमवेत सेल्फी काढण्यासाठी त्यांची लगबग सुरूच होती. काहींनी प्रत्यक्ष भजन म्हणण्यात, वारकºयांबरोबर नाचण्यात सहभाग घेतला. पंढरीकडे प्रयाण करणाºया वारकरी बांधवांना सामाजिक, पर्यावरणपूरक, आरोग्यविषयक संदेश देण्याकरिता सामाजिक सेवांनी पुढाकार घेतला होता. पोस्टर, पत्रके, निरनिराळी वेशभूषा यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करत प्रबोधनाचे काम केले. यात तरुणाईचा सहभाग उत्स्फूर्त होता. प्लॅस्टिकबंदीलाही वारकºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले.

माऊलीसेवेची मिळावी संधी
लाखो भाविक पुण्यात दाखल झाल्यानंतर, त्यांच्या राहण्या-खाण्याची सोयदेखील तितक्याच अगत्याने करण्यात पुणेकर कुठेही कमी पडले नाहीत.

विविध सांस्कृतिक कार्यालये, मंगल कार्यालये, गणेश मंडळांच्या जागेत, वारकºयांची व्यवस्था करण्यात आली होती.

एक दिवस मुक्कामाला असणाºया विठ्ठलभक्तांच्या पाहुणचारात काही कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यात वेगवेगळ्या मंडळाचे व्यवस्थापक, पदाधिकारी, नगरसेवक व्यस्त होते.

Web Title:  Arrival of Varunaraja on the occasion of the ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.