अण्णा भाऊंची कला जीवनासाठी : अतुल पेठे; लघुपट महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:50 PM2017-10-14T17:50:07+5:302017-10-14T17:54:41+5:30
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे राट्रीय लघुपट महोत्सव समितीच्या वतीने लघुपट चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : एखादा कलावंत सामाजिक व राजकीय बांधिलकी कशी सांभाळतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठे. पूर्वीच्या काळी कलेसाठी कला की जीवनासाठी कला असे दोन वाद होते. अण्णा भाऊंची कला ही जीवनासाठी होती. एखाद्या माणसाची कला किती उत्तुंग असावी, याचे उत्तम दर्शन अण्णा भाऊंमध्ये घडते. त्यांनी कादंबर्या, नाटके लिहिली. वेगवेगळ्या दबलेल्या समूहाचे आवाज त्यांनी आवाज नसलेल्या लोकापर्यंत पोहोचविले. हेच कलेचे साधन असल्याचे ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे यांनी सांगितले.
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान पाहता त्यांचा समतेचा सांस्कृतिक वारसा पुढे जावा यासाठी यासाठी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे राट्रीय लघुपट महोत्सव समितीच्या वतीने आयोजित लघुपट चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ढोलकीवादक मोहन अडसूळ, आयोजक सचिन बगाडे उपस्थित होते. यावेळी अतुल पेठे यांना अण्णा भाऊ साठे खंड १ भेट देण्यात आला.
अतुल पेठे म्हणाले, अण्णा भाऊ साठे लोकशाहीर होतेच पण साम्यवादी विचारांचे कॉम्रेड होते. लेनिन घराण्याचा पोवाडा असेल रशियन प्रवासवर्णन असेल. शाहिरी परंपरेतमधले अनेक शाहिर त्यांचे मित्र होते. एकाअर्थाने त्यांच्या मानसिक, बौध्दिक आणि सांस्कृतिक विकासाच्या पटलावर अण्णा भाऊंना नेऊन ठेवले होते.