बालपणातील कलेचा भविष्यात फायदा होतो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:18 PM2019-11-14T13:18:53+5:302019-11-14T13:25:24+5:30
लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करणाºया कलाकारांचे मत
अतुल चिंचली-
पुणे : प्रत्येकामध्ये जन्मापासूनच एखादी कला असते. आयुष्यात कलेला खूपच महत्त्व आहे. मुलांचा कला, अभिनय, नाट्य क्षेत्रात कल असेल, तर पालकांची जबाबदारी आहे, की मुलांना लहानपणीच कला जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून बालवयात मनापासून आत्मसात केलेल्या कलेचा भविष्यकाळात नक्कीच फायदा होतो, असा सकारात्मक संदेश लहानपणापासून अभिनय क्षेत्रात असणाºया कलाकारांनी दिला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून ‘लोकमत’ने तरुण कलाकारांशी संवाद साधला.
..........
मी वयाच्या तिसºया वर्षापासून वक्तृत्व, कथाकथन, भाषणे अशा स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. दुसरीत नाटकात व चौथीत असताना ‘युवराज’ या हिंदी चित्रपटात काम केले. बालकलाकार म्हणून काम करताना वाईट सवयी लागणे, अज्ञात व्यक्तींच्या संपर्कात आल्याने नुकसान होणे, यशाची चव चाखल्याने डोक्यात प्रसिद्धीची हवा जाणे अशा काही नकारात्मक गोष्टी जाणवल्या; पण प्रत्येक प्रोजेक्टवर सकारात्मक विचारानेच काम केले. ‘युवराज, बोक्या सात बंडे, हॉस्टेल डेज, सुरसपाटा’ अशा मराठी चित्रपटांत काम केले आहे. लहान मुलांना कलेची आवड असते. त्यापासून त्यांना थांबवू नका. लहान वयात कुठलाही तणाव नसतो. त्यामुळे ते कलेसाठी बुद्धीचा वापर करू शकतात. मी आता कलर्स मराठीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेत माधवराव यांची भूमिका करत आहे. - चिन्मय पटवर्धन, कलाकार
.......
मी बालनाट्यापासून अभिनयाला सुरुवात केली. तेव्हा काही कळत नव्हते. लहान असताना लोकांच्या नकला, हिरोंप्रमाणे अभिनय करत होतो. बालपणातच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने टेक्निकल गोष्टी कळत गेल्या. लहान असताना चेहरा निरागस असतो. त्यामुळे चेहºयावर हावभाव दिसून येतात; पण वय वाढत जाईल तसे हावभाव आणावे लागतात. जन्मापासूनच असणाºया कलेकडे छंद म्हणूनच पाहावे, त्याचा करिअर म्हणून भविष्यात उपयोग होऊ शकतो. मी स्टार प्रवाहावरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’मध्ये डॉ.बाबासाहेबांच्या मेहुण्याची भूमिका करीत आहे.- चिन्मय संत, कलाकार
.....
माझी पुण्यातील बालनाट्यातून सुरुवात झाली. ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्री, बालगंधर्व, बोक्या सातबंडे, रानभूल’ अशा चित्रपटांत काम केले आहे. माझे बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय शाळेत शिक्षण झाले. कुटुंबात पूर्वीपासून नाटकाचा वारसा होता; त्यामुळे शाळेत होणाºया आॅडिशनमध्ये कधीही अडथळे आले नाहीत. अभिनयाची एवढी आवड असूनही अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. अभिनय क्षेत्र खूप मोठे आहे. मुलांनी हिरो होण्यासाठी अभिनय क्षेत्रात जाऊ नये. अभिनयाव्यतिरिक्त चित्रकला, हस्तकला अशा कलांनाही प्राधान्य द्यावे. बालपणात मुलांनी आपली कला छंद म्हणून जोपासण्यास सुरुवात केली, की करिअरच्या दृष्टीनेही फायदा होतो. सध्या स्टार प्रवाहवरील ‘विठू माऊली’ मालिकेत पुंडलीकाची भूमिका करीत आहे. - अथर्व कर्वे, कलाकार
.........