कलामंडलला ‘लोकमत’च्या माध्यमातून कलासहयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:35+5:302021-05-26T04:10:35+5:30
राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निवृत्त अभियंता शाम ढवळे यांनी उभारलेल्या कलामंडलबाबत ‘लोकमत’मध्ये वाचल्यानंतर एका कलाकार दाम्पत्याने ...
राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निवृत्त अभियंता शाम ढवळे यांनी उभारलेल्या कलामंडलबाबत ‘लोकमत’मध्ये वाचल्यानंतर एका कलाकार दाम्पत्याने तिथे भेट दिली. तिथला कलाविष्कार पाहून या दाम्पत्याने आपला सहयोग म्हणून संग्रहालयाच्या भिंती सुशोभित केल्या आणि परिसरातही विविध रंगचित्रे काढली.
महापालिकेतून निवृत्त झाल्यावर ढवळे यांनी पौड रस्त्यावरील दरवडे गावात स्वमालकीच्या जागेत जुन्या वस्तूंचे दुमजली संग्रहालय बांधले आहे. कलामंडल त्याचे नाव. ढवळेंच्या या छंदाची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. ती वाचून उल्हास व वैशाली कागदे या चित्रकार दाम्पत्याने मागच्याच आठवड्यात कलामंडलला भेट दिली. कलामंडलमध्ये चित्र काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यास ढवळे यांनी सहर्ष अनुमती दिली.
जुन्या वाड्यासारखे बांधकाम लक्षात घेऊन या दाम्पत्याने सगळे कलामंडल पेशवाईतील चित्रशैलीने सुशोभीत केले आहे. खिडक्या गवाक्षांमध्ये रूपांतरीत झाल्या तर महिरपी लाकडी तक्तपोशीच्या भिंतीवर सुरेख चित्र अवतरली. सिद्धार्थ मेश्राम व स्वप्निल निगडे यांनी साह्य केले.
“एका छांदिष्टाच्या कामात ‘लोकमत’मुळे सहभागी होता आले याचाच फार मोठा आनंद आहे. आम्ही चित्र नेहमीच काढतो, पण इथे काढण्यातला आनंद अवर्णनीय आहे,” अशी भावना कागदे दाम्पत्याने व्यक्त केली. ‘लोकमत’मुळे हा चित्रयोग जुळून आल्याचे ढवळे यांनी सांगितले.