कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:39+5:302021-07-04T04:08:39+5:30
पिंपरी : मराठमोळ्या कला दिग्दर्शकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे येथे शनिवारी (दि.३) पहाटे ही घटना ...
पिंपरी : मराठमोळ्या कला दिग्दर्शकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे येथे शनिवारी (दि.३) पहाटे ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
राजेश मारुती साप्ते असे आत्महत्या केलेल्या कला दिग्दर्शकाचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप्ते कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास आहेत. ताथवडे येथेही त्यांचा फ्लॅट आहे. राजेश साप्ते हे मुंबई येथून शुक्रवारी एकटेच त्यांच्या ताथवडे येथील घरी आले. त्यानंतर आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, साप्ते यांच्या पत्नीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी राजेश साप्ते यांनी घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच साप्ते यांचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ तयार केला. त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत. सर्व पैसे दिलेले असतानाही मौर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे अनेक प्रकल्प अडकल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्याकडे सध्या पाच प्रोजेक्ट आहेत; पण मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतेही काम करता येत नाही. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावा लागला. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे, असे साप्ते यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
फोटो - राजेश साप्ते