कला देतीये त्यांना जगण्याचं बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:11 PM2018-12-03T19:11:06+5:302018-12-03T19:12:13+5:30
रस्त्यावर बसून राजेंद्र खळे गेल्या 6 वर्षांपासून चित्रे रेखाटत अाहेत. अायुष्यात अठराविश्व दारिद्र असताना कलेबद्दलचे त्यांचे प्रेम कुठेही कमी झाले नाही.
राहुल गायकवाड
पुणे : उपजीविकेसाठी अावश्यक असणाऱ्या विषयाचे शिषण जरुर घ्या, पाेटापाण्याचा उद्याेग जिद्दीने करा पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पाेटापाण्याचा उद्याेग तुम्हाला जगवेल. पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल. पु. ल. देशपांडे यांचा हा संदेश. फाटके कपडे, पायाने अपंग, राहायला घर नाही पण कलेसाठीची तळमळ कुठेही कमी झाली नाही. जगण्यासाठीच्या मुलभूत सुविधा नसताना ताे माणूस जगताेय ते केवळ कलेसाठी. शेवटच्या श्वासापर्यंत चित्र काढत राहणार असं ते अभिमानाने सांगतात. ही कथा अाहे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर बसून चित्र रेखाटणाऱ्या राजेंद्र खळे यांची.
गेल्या 6 वर्षांपासून राजेंद्र खळे हे फर्ग्युसन रस्त्यावर बसून स्केचेस काढतात. लहानपणी वडील वारले. अाईचेही छत्र हरवले. अायुष्यात अठराविश्व दारिद्र. नातेवाईकांनी सांभाळले नाही म्हणून घर साेडावे लागले. अवघ्या सातवीत शाळा साेडावी लागली अाणि सुरु झाला त्यांच्या एका वेगळ्या अायुष्याचा प्रवास. 53 वर्षांचे राजेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर फुटपाथवर बसून चित्रे काढून देतात. शाळेत असताना चित्र काढण्याची अावड हाेती. परंतु शाळा साेडावी लागल्याने ती अावड मागेच राहिली. शहरभर भटकत परिणामी भिक मागत अायुष्य जगत असताना नियतिने अजुन एक घाला त्यांच्यावर घातला. एका अपघातात राजेंद्र यांना अंपगत्व अाले. पाेलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. बरे झाल्यानंतर त्यांना कुबड्या मिळवण्यासाठी सुद्धा वणवण लाेकांकडे मागत भटकावं लागलं. असं असताना त्यांच्या अंगातील कला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लाचारीत जिणं त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी वाडीया काॅलेजजवळील फुटपाथवर बसून चित्रे काढण्यास सुरुवात केली.
सुरुवातील संजय दत्तचे चित्र काढून ते त्यांनी विकले. त्यानंतर बाळासाहेबांचे अनेक चाहते असल्याने त्यांनी त्यांची चित्रे काढण्यास सुरुवात केली. रस्त्यावर राहून ते चित्र काढू लागले. रस्त्यावरुन येणारे जाणारे ते रेखाटत असणारे चित्र पाहून अंचिबित हाेऊ लागले. अनेक तरुण त्यांच्याकडे स्वतःचे चित्र काढून देण्याची मागणी करु लागले. त्यानंतर राजेंद्र फाेटाेवरुन किंवा समाेर बसून हुबेहुब चित्र काढू लागले. त्यांना चित्रकलेची कुठलेही शिक्षण नाही. त्यांनी काढलेली चित्रे पाहून अनेक चित्रकारांनी त्यांना मार्गदर्शन केले. अाजही राजेंद्र रस्त्यावर राहतात. फर्ग्युसन रस्त्यावर दिवसभर बसून ते चित्रे रेखाटत असतात. अनेक तरुण तरुणी त्यांच्याकडून अापली चित्रे रेखाटून घेत असतात. अगदी कमी पैशात राजेंद्र त्यांना चित्रे काढून देतात. या कलेनेच मला जगवलंय त्यामुळे शरीरातील शेवटच्या रक्त्याच्या थेंबापर्यंत चित्र काढत राहिल असं राजेंद्र खळे सांगत असताना त्यांच्या डाेळ्यात कलेप्रतीचे प्रेम दिसून येते.