कलासाक्षरता महत्त्वाची : सावनी रवींद्र (कलारंग)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:29+5:302021-03-26T04:12:29+5:30
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काय भावना आहेत? - आयुष्यात किमान एकदा तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न ...
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काय भावना आहेत?
- आयुष्यात किमान एकदा तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. तसेच माझेही हे स्वप्न होते; कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पुरस्कार मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच; मात्र, त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही झाली आहे. रसिकांच्या माझ्याकडून, माझ्या कारकिर्दीबद्दल अपेक्षा उंचावल्या आहेत. अधिकाधिक कष्ट घेऊन मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि अभिजात संगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
* संगीत शैली आत्मसात करण्यासाठी काय प्रयत्न केलेस?
सांगीतिक कुटुंबात जन्म झाला, हे माझे खूप मोठे भाग्य आहे. आई आणि बाबा दोघांनीही शास्त्रीय संगीतात पीएचडी केलेली आहे. संगीत नाटकांची परंपराही मला त्यांच्याकडूनच मिळाली. लहानपणापासून माझा कल सुगम संगीताकडे होता. मला माझ्या आवडीप्रमाणे संगीत शिकायला आई-बाबांनी नेहमी प्राधान्य दिले. यशवंत देव, रवी दाते, पंढरीनाथ कोल्हापुरे यांसारख्या गुरूंकडून मी घडत गेले. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांचा सहवासही मला लाभला. प्रत्येक गीतप्रकाराची वेगळी शैली असते. प्रत्येक शैली मनापासून आत्मसात करायची, अभ्यासायची असे मी ठरवले. आज-काल यूट्यूबवर संगीत शिकण्यासाठी नानाविध प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र गुरुमुखी परंपरेवर माझा जास्त विश्वास आहे.
* आजकाल संगीताचे बरेच रिअॅलिटी शो टीव्हीवर पाहायला मिळतात. त्यातून मिळणारी प्रसिद्धी मारक ठरते की तारक?
संगीत ही जगण्याची शैली आहे, असे मला वाटते. मला आयुष्य संगीतासाठी वाहून घ्यायचे आहे, मी केवळ कार्यक्रमापुरते गाणार नाही, हे ज्यांनी ठरवलेले असते, ते नक्कीच कलेची मनापासून साधना करू शकतात. कोणतेही कलाक्षेत्र अशाश्वत आहे, हे विसरून चालणार नाही. रिअॅलिटी शोमधून आपल्याला प्रसिद्धी मिळते हे खरे असले तरी प्रसिद्धीपेक्षा कलेची साधना जास्त महत्त्वाची असते. प्रसिद्धी मिळवल्यानंतर ती टिकून ठेवणे जास्त अवघड असते.
* आपल्याकडे शालेय शिक्षणात कलेला फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामध्ये बदल होण्याची गरज वाटते का?
- परदेशात शाळांमध्ये संगीत हा विषय सक्तीचा आहे. संगीत शिकणारा प्रत्येक जण कलाकार होऊ शकत नसला तरी त्यांच्यातला श्रोता नक्कीच घडतो. भारताला संगीताची अप्रतिम संस्कृती लाभलेली आहे. मात्र, त्या दृष्टीने शालेय शिक्षणामध्ये कलेला तितकेसे महत्त्व दिले जात नाही. कला साक्षरता महत्त्वाची आहे, हे जाणून घ्यायला हवे. कला प्रत्येकाला नैराश्यातून तारते, सकारात्मकतेचा मार्ग दाखवते. कलेचा साक्षरता दर आपण नक्कीच तपासून पहायला हवा.
* इतर प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील?
- सध्या मी ''सावनी ओरिजनल'' या यूट्यूब सिरीजवर काम करत आहे. यामध्ये मी बंगाली, गुजराती, तमिळ अशा विविध भाषांमधील गाणी करत आहे. या सीरिजमधील आणखी काही गाणी तयार आहेत आणि त्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ''लताशा'' सारखे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभरापासून सांगीतिक कार्यक्रम पूर्णतः बंद आहेत. माझ्याप्रमाणे प्रत्येक कलाकाराला रंगमंचावर येण्याची उत्सुकता आहे. ''बार्डो'' या चित्रपटातील ''रान पेटलं'' या गाण्याचे संगीत रोहन रोहन यांचे असून श्वेता पेंडसे यांनी गीत लिहिले आहे.