कला प्रवाही असायला हवी
By admin | Published: June 3, 2017 02:56 AM2017-06-03T02:56:18+5:302017-06-03T02:56:18+5:30
ज्याप्रमाणे आज शूरवीरांचे पोवाडे गायले जातात, त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणाऱ्या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्याप्रमाणे आज शूरवीरांचे पोवाडे गायले जातात, त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणाऱ्या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील पोवाडेदेखील गायला हवेत. कला ही प्रवाही, नवीन गोष्टींना सामावून घेणारी असायला हवी. यासाठी विचारसन्मुख करणारे साहित्य वाचायला हवे. आपले पोवाडे, लावण्या हे आपले वैभव आहे. परंतु, त्यांना पुढे न्यायचे असेल तर नवीन गोष्टी अंगीकारत जुन्यांमध्ये देखील बदल करायला हवेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली.
शाहीरसम्राट किसनराव हिंगे यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर जाधव, सरदार दाभाडे घराण्याच्या वंशज माँसाहेब वृषालीराजे दाभाडे, प्रबोधिनीचे अध्यक्ष हेमंत मावळे, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात शाहिरी निनाद -अमर शाहिरी या विशेषांकाचे प्रकाशन झाले. किसनराव हिंगे यांचे सहकारी ढोलकीवादक बंडा देशमुख यांचा विशेष गौरव करण्यात आला. शाहीर हेमंत मावळे आणि सहकारी यांनी या वेळी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला. पोवाडा वर्गातील बालशाहिरांनादेखील गौरविण्यात आले.
अतुल पेठे म्हणाले, ‘कला सामाजिक प्रबोधनासाठी आहे. आज जगातील अस्थिरता बघता आपल्याला शांत होण्याची गरज आहे. यासाठी शांततेचे गुणगान गाणारा आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगणारा पोवाडा गायला हवा. जग बदलायचे असेल तर ते हिंसेने नाही तर सकारात्मक विचारांनी बदलायला हवे. हे बदल घडविण्यासाठी चांगले विचार समोर यायला हवेत’, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. मनोहर जाधव म्हणाले, ‘आजच्या विद्यार्थ्यांमधील विचारक्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतील, असे शिक्षण दिले पाहिजे. तरच, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. पोवाडा वर्गातून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती दिली जाते. असे कलेचे वर्ग वाढायला हवेत.’ शाहिरा प्रा. रूपाली मावळे-देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे शौर्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम हे शाहिरीच्या माध्यमातून झाले. या कलेतून इंग्रजांविरुद्ध लढण्याचे बळ दिले. परंतु, आज समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची गरज आहे. नवीन पिढीला देशभक्तीने प्रेरित करायचे असेल, तर शाहिरी काव्याशिवाय पर्याय नाही.
- शरद कुंटे