कला हा मानवी संस्कृतीचा खजिना : श्रीपाल सबनीस; सावित्रीबाई फुले स्मारक येथे संगीत मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:06 PM2017-12-08T16:06:09+5:302017-12-08T16:09:38+5:30
कलांमुळेच मानवी जीवन सुसह्य, शांत आणि समृध्द झाले आहे, असे उदगार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. सुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते.
पुणे : सध्याचे समाजजीवन अनेक प्रश्नांनी आणि वेदनांनी व्यापलेले आहे. तणावग्रस्त जीवनामध्ये कलात्मक सौंदर्याची अभिव्यक्ती माणसाला दिलासा देते. कलावंतांच्या साहित्य, कलांच्या प्रवाहातील तपश्चर्या मानवी संस्कृतीला आनंद प्रदान करतात. कलांमुळेच मानवी जीवन सुसह्य, शांत आणि समृध्द झाले आहे. कला ही मानवी संस्कृतीचा खजिना आहे, असे उदगार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
सुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते. या मैफिलीचे संयोजन सम्राट नाईक यांनी केले होते. याप्रसंगी दादा महाराज नगरकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ.एन.वाय.पाटील, डॉ. सत्यशील नाईक, बंडा जोशी, योगिता पाखले, रणजित नाईक, सुनिता पाटील, अक्षता तिखे, उषा बढे आणि इतर कलावंतांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे पार पडला.
सबनीस म्हणाले, ‘स्वर्ग ही माणसाची काल्पनिक संकल्पना आहे. पृथ्वीवरील भौतिक जीवनात स्वर्गस्थ आनंद देणारी क्षमता केवळ कलेमध्ये असते. मानवी जीवनात कलाप्रवाह नसता, तर आयुष्य निरर्थक ठरले असते. त्यामुळे कलावंत, कलाकृती आणि रसिक यांची परंपरा माणसांनी जपलेल्या आहेत. कलात्मक श्रीमंती हेच संस्कृतीचे खरेखुरे वैभव असते. या वैभवाचा कलावंत ध्यास घेतात आणि त्यासाठी श्वास पेरतात.’