कला ही समाजाला जोडण्याचे करते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:20 AM2018-12-20T02:20:02+5:302018-12-20T02:20:25+5:30

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचे प्रतिपादन : ३४ व्या आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे उद्घाटन

Art works to connect the community | कला ही समाजाला जोडण्याचे करते काम

कला ही समाजाला जोडण्याचे करते काम

Next

पुणे : कला ही माणसाच्या मनाला विशाल बनविते, कलेतून माणसाला आनंद मिळतो. हीच कला समाजाला जोडण्याचेही महत्त्वपूर्ण काम करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी बुधवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ३४ व्या ‘युवास्पंदन’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे उद्घाटन राजदत्त, अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय विश्वविद्यालय संघाचे सहसचिव डेव्हिड सॅमसन, निरीक्षक सुरेंद्र मोहन कांत, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते.

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व गोवा या ४ राज्यातील ३२ संघ व ८०० विद्यार्थी या युवा महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. दुपारी तीन वाजता शोभायात्रेने महोत्सवाला सुरूवात झाली. मुख्य इमारतीपासून सुरू झालेली शोभायात्रा मुख्यमंडपात आल्यानंतर उद्घाटन कार्यक्रमाला सुरूवात झाली. राजदत्त म्हणाले, कला ही व्यक्ती व समाजाला आनंद देणारी बाब असते. युवास्पंदन महोत्सवाच्या निमित्तानेही हेच अनुभवायला मिळत आहे. कोणत्याही कलेला पूर्णत्व नसते, याची जाणीव ठेवणारा कलावंत हा जिवंत असतो. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनीही हे जाणून घ्यावे.

गिरीश कुलकर्णी म्हणाले, शिक्षणामधून कलेकडे दुर्लक्ष होत असताना, कलेचा जाणीवपूर्वक विचार करण्याचे काम अशा महोत्सवांमधून होत असते. युवकांसाठी हा काळ नवनिर्मितीचा काळ असतो. अशा महोत्सवांमधून युवकांनी कलेद्वारे स्वत:चा शोध घेण्याची गरज आहे. त्या आधारे मिळणाऱ्या संवेदना एकमेकांना तसेच समाजाला समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
तारुण्यावस्था हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ असतो, याच काळात बदल घडविण्याची क्षमता तरुणाईमध्ये असते, असे डेव्हिड सॅमसन यांनी सांगितले. केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर शिक्षकांनीही कलेमध्ये रुची वाढवावी, असे आवाहनही डॉ. नितीन करमळकर यांनी केले. परराज्यातील विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच, सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेल्या पुण्याच्या संस्कृतीची महोत्सवासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी ओळख करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
युवा वर्गावर चांगले संस्कार या महोत्सवाच्या माध्यमातून होतील, असा विश्वास राजेश पांडे यांनी व्यक्त केला. डॉ. प्रभाकर देसाई यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. डॉ. संजय चाकणे यांनी आभार मानले.

४०० स्वयंसेवकांची फौज
च्युवास्पंदन महोत्सवासाठी शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी अशा ४०० स्वयंसेवकांची फौज नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी २८ समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
च्स्पर्धक, परीक्षक, पाहुणे यांना सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्वयंसेवकांवर आहे. कॅम्पसची स्वच्छता, बॅनर लावणे व इतर छोट्या मोठ्या जबाबदाºया स्वयंसेवकांकडून उचलल्या जात आहेत. अत्यंत आनंदाने ते या कामामध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे.

शोभायात्रेने रंगत
महोत्सवाच्या शोभायात्रेला दुपारी तीनच्या सुमारास सुरूवात झाली. गुजरात विद्यापीठ, जयनरीन व्यास विद्यापीठ जोधपूर, पारूल विद्यापीठ, हेमचंद्र उत्तर गुजराथ विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, गुजरात तंत्रशिक्षण विद्यापीठ आणि यजमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी संघ या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्याची संस्कृतीची ओळख करून देणारे पारंपारिक वेश परिधान केले होते. जोधपूर व गुजरात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पारंपारिक नृत्य सादर केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश शोभायात्रेतून दिला. काही संघ पोहचण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना शोभायात्रेमध्ये सहभागी हाता आले नाही.

Web Title: Art works to connect the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे