आर्टिफिशिअल इंटेलिजन्स : एक नवीन क्षितिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:50+5:302021-04-01T04:10:50+5:30

क्लाऊड तंत्रज्ञान, इंटरनेट, सोशल मीडिया , इंटरनेट ऑफ थिंग्ज, मोबाइल या तंत्रज्ञानातील नवीन शोधांमुळे एआयचा वापर वाढू लागला ...

Artificial Intelligence: A New Horizon | आर्टिफिशिअल इंटेलिजन्स : एक नवीन क्षितिज

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स : एक नवीन क्षितिज

Next

क्लाऊड तंत्रज्ञान, इंटरनेट, सोशल मीडिया , इंटरनेट ऑफ थिंग्ज, मोबाइल या तंत्रज्ञानातील नवीन शोधांमुळे एआयचा वापर वाढू लागला आहे. व्यवसायाशी निगडित असलेल्या डेटाचे विश्लेषण करून त्यातून उद्योगपूरक असे नवीन अंदाज बांधणे ही प्रत्येक लहान-मोठ्या कंपनीची गरज बनली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून एआय तंत्रज्ञान फक्त टेक्नाॅलॉजी कंपन्यांची मक्तेदारी न राहता मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनांन्शिअल सेवा, रिटेल, शेती एवढंच काय तर संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातही एआयचा वापर वाढू लागला आहे.

नॅसकॉमच्या एका अलीकडील रिपोर्टप्रमाणे डेटा आणि एआय तंत्रज्ञान हे २०२५ सालापर्यंत भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ४५० ते ५०० बिलियन डॉलर एवढी भर घालू शकेल एवढ्या क्षमतेचे आहे.

एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढल्यामुळे कित्येक नोकऱ्यांवर गदा येईल का? या प्रश्नाकडे आपण थोडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. एआय तंत्रज्ञान वापरून पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामे ऑटोमेट करता येतील, अशा प्रकारच्या नोकऱ्या कमी झाल्या तरी एआय तंत्रज्ञानामुळे नवीन नोकऱ्या तयार होतील. एआय इंजिनिअर, मशिन लर्निंग इंजिनिअर, बिग डेटा डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनॅलिस्ट या सारख्या नोकऱ्यांसाठी खूप मागणी आहे. सगळ्याच क्षेत्रातील कंपन्या एआय तंत्रज्ञान वापरू लागल्या की ही मागणी अजून वाढतच जाईल.

एआय तंत्रज्ञान हे प्रोगामिंगपेक्षा थोडेसे वेगळ आहे. समजा आपल्यालाकार साठी प्रोग्रॅम लिहायचा आहे. त्या कारला रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांचा अंदाज आधी बांधून प्रोग्रॅम लिहिणे शक्य नाही. त्याऐवजी समोर अडथळा आला की काय करायचे याचे प्रोग्रॅम लिहिणे सोपे आहे. अशा एकत्रित प्रोग्रॅमचा वापर करून कार स्वत:च आपला मार्ग शोधू शकते. प्रत्येक हालचालीचा डेटा एकत्र करून त्यातून शिकू शकते. त्यालाच मशिन लर्निंग म्हणतात.

एआय तंत्रज्ञानामध्ये मशिन लर्निंगचे प्रकार, कॉम्प्युटर व्हिजन, डीप लर्निंग यांचा समावेश होतो. एआय तंत्रज्ञानामधील करिअर नक्कीच आव्हानात्मक आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असू शकते. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे मूलभूत शिक्षण, प्रोग्रामिंगची माहिती आणि गणित व संख्याशास्त्र यांचा भक्कम पाया यासाठी आवश्यक ठरतो. संख्याशास्त्र, मशिन लर्निंगचे वेगवेगळे अल्गोरिदम्स, पायथन आणि आर प्रोग्रामिंग भाषा शिकल्यास मशिन लर्निंगवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. एआय, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांवर विशेष प्रावीण्य देणारी पदवी किंवा या विषयाशी संबंधित असे खासगी क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त नवीन गोष्टी शिकण्याच्या ध्यासाची. एआयमध्ये तर मशिन्स पण शिकतात, मग आपण का मागे राहायचं? त्यामुळे या नव्या क्षितिजाकडे एक वेगळी करिअरची संधी म्हणून पाहता येईल.

- राजेश वर्तक, संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ

Web Title: Artificial Intelligence: A New Horizon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.