दिव्यांगांची शिबिरे ठरतायेत कृत्रिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:37 AM2018-04-14T00:37:36+5:302018-04-14T00:37:36+5:30

केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि भारतीय कृत्रिम अंग निगमच्या (एलिम्को) वतीने देशभर गाजावाजा करीत राबविलेल्या दिव्यांग योजनेतील कृत्रिमपणा उघड झाला आहे.

Artificial selection of Divyanagang camps | दिव्यांगांची शिबिरे ठरतायेत कृत्रिम

दिव्यांगांची शिबिरे ठरतायेत कृत्रिम

Next

- विशाल शिर्के 
पुणे : केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि भारतीय कृत्रिम अंग निगमच्या (एलिम्को) वतीने देशभर गाजावाजा करीत राबविलेल्या दिव्यांग योजनेतील कृत्रिमपणा उघड झाला आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर अडीच ते ११ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही लाभार्थ्यांना सहायक साधने मिळालेली नाहीत.
केंद्र सरकारच्या या योजनांचा प्रसार खासदारांच्या माध्यमातून सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातदेखील या योजनेची शिबिरे आयोजित करून दिव्यांगांची नावनोंदणी करण्यात आली. या योजनेंतर्गत अस्थिव्यंग, दिव्यांग, बहुविकलांग, अंध आणि कर्णबधिर व्यक्तींना व्हिलचेअर, अंध काठी, सर्जिकल शूज, श्रवणयंत्र अशा प्रकारची विविध साधने मोफत देण्याची तरतूद आहे. अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपुढे असणाऱ्या व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार रुपये अथवा पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ४० हजार रुपयांच्या आत असल्यास या योजनेसाठी पात्र ठरण्याची अट आहे. पुणे महापालिकेच्या सहयोगाने २२ ते २५ जानेवारीदरम्यान औंधचे जिल्हा रुग्णालय, मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल, येरवड्याचे राजीव गांधी हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शिबिर आयोजित करण्यात आले होते. निगडी प्राधिकरण येथे तर २६ मे २०१७ रोजी असे शिबिर घेऊन नावनोंदणी करण्यात आली. अपंगत्वानुसार कोणते सहायक साधन लागेल, त्याची किंमत किती असेल याचा उल्लेख असलेली पावतीदेखील संबंधित दिव्यांगांना देण्यात आली. मात्र, दोन्ही शिबिरांतील
लाभार्थ्यांना अजूनही कोणतीच साधने देण्यात आलेली नाहीत. पुण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे आणि पिंपरी-चिंचवडची धुरा खासदार अमर साबळे यांनी सांभाळली होती. याबाबत विजय पगडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड येथील शिबिरात मी सहभागी होतो. मला अस्थिव्यंग असल्याने क्रचेस आणि कॅलिपर देण्यात येईल असे सांगितले. तशी पावतीदेखील दिली. गेल्या वर्षी मे महिन्यात हे शिबिर झाले. वर्ष होत आले तरी साधने मिळालेली नाहीत.
>उपक्रमांतर्गत ही साधने मिळणार होती मोफत
अस्थिव्यंग : ट्रायसिकल, व्हिलचेअर, क्रचेस, कॅलिपर, रोलेटर, वॉकिंग स्टीक
मतिमंद/बहुविकलांग : स्प्लिंट, सर्जिकल शूज, स्पाइनल ब्रेस, अप्पर-लोअर लिम्ब, सर्वाइकल ब्रेस, नी-एल्बो गटर, एम. आर. कीट.
अंध : अंध काठी, ब्रेलर प्लेट, ब्रेल किट, अंध व्यक्तींसाठीचा मोबाईल
कर्णबधिर : श्रवणयंत्र (बीटीई आणि पॉकेट मॉडेल)
>दिव्यांगांना सहायक साधने वितरणासाठी अनेकदा शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, ती साधने त्यांना वेळेत मिळत नाहीत. वितरीत केलेल्या साहित्याचा दर्जा चांगला नसतो. केंद्रीय समाज कल्याण विभागाच्या सहकार्याने आयोजित शिबिरात नावनोंदणी करून ११ महिने उलटल्यानंतरही अनेकांना साधने मिळाली नाहीत.
- हरिदास शिंदे, अध्यक्ष अपंग हक्क सुरक्षा समिती
>मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते साधने देण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
- अनिल शिरोळे, खासदार
>येत्या महिनाभरात दिव्यांगांसाठी आणखी एक शिबिर आयोजित केले जाणार आहे. त्यातच सहायक साधनांचे देखील वितरण केले जाणार आहे.
- अमर साबळे, खासदार

Web Title: Artificial selection of Divyanagang camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.