विषारी नागिणीची अंडी कृत्रिम पद्धतीने उबवून १८ पिलांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:11+5:302021-07-11T04:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : शिक्रापूर येथे सर्पमित्राने पकडलेल्या विषारी नागिणीने दिलेल्या १९ अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : शिक्रापूर येथे सर्पमित्राने पकडलेल्या विषारी नागिणीने दिलेल्या १९ अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने तब्बल १८ नागाच्या पिलांना जन्म देण्यात वन्य, पशु, पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांना यश आले आहे. सर्व पिलांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले आहे.
शिक्रापूर येथील वन्य, पशु, पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, शेरखान शेख, शुभम वाघ यांनी दोन महिन्यांपूर्वी एक कोब्रा जातीचा विषारी नागाला पकडले होते. त्याला त्यांनी बरणीमध्ये ठेवलेले. या नागाने बरणीमध्येच एकोणीस अंडी घातली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले. त्यांनी तातडीने शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना याबद्दल माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अंडी विशिष्ट अशा मातीमध्ये कृत्रिम पद्धतीने उबविण्यास ठेवली. संस्थेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, शेरखान शेख, शुभम वाघ, बाळासाहेब मोरे, अमोल कुसाळकर, पूजा बांगर यांनी वेळोवेळी अंड्यांची पाहणी सुरू ठेवली. त्यांनतर तब्बल ७० दिवसांनी त्या अंड्यांतून अठरा पिल्ले जन्मलेली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले. त्यांनतर शनिवारी शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना माहिती देत शिरूर वनविभागाच्या वनरक्षक सोनल राठोड यांच्या उपस्थितीत सर्व नागाची पिल्ले निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आली आहे.
फोटो : शिक्रापूर येथील सर्पमित्रांनी कृत्रिम पद्धतीने जन्म दिलेली नागाची पिल्ले. (धनंजय गावडे)