अरुभय्यांची गाणी कायम मनात रुंजी घालतील - अनुराधा मराठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:29 AM2018-05-07T02:29:52+5:302018-05-07T02:29:52+5:30
सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला,’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा.
सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला,’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा. आता यापुढे कधीच अरुभय्यांबरोबर गाता येणार नाही याची खंत वाटते, अशा भावना गायिका अनुराधा मराठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
अरुण दाते यांच्यासह मी ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे शंभराहून अधिक प्रयोग केले. प्रत्येक मैफलीच्या वेळी अरुभय्या नव्याने उलगडत गेले. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांची प्रचंड दाद मिळायची, प्रत्येक मैफल ‘हाऊसफुल’ असायची. त्यांच्या बरोबरीने गायन करणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट ठरली. अरुण दाते यांनी आपल्या घरंदाज गायकीने गायनाच्या क्षेत्रात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले होते. सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. त्यांना प्रत्येक कलाकाराबद्दल कायमच आदर वाटायचा. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा.
अरुण दाते यांनी भावसंगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात त्यांची गाणी पुढील अनेक वर्षे रुंजी घालत राहतील, यात शंका नाही. त्यामुळेच ते गेल्याची खंत कायम अस्वस्थ करणारी आहे. रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणे अवघड असते. हे शिवधनुष्य अरुण दाते यांनी आपल्या गायकीतून लीलया पेलले. ते आजारी असतानाही ‘शुक्रतारा’वर रसिकांनी भरभरून प्रेम केले आणि यापुढेही
करत राहतील, हीच अरुभय्यांच्या गाण्यांची किमया म्हणावी लागेल. अरुण दाते गाण्यांच्या रूपाने कायम चिरतरुण राहिले. त्यांची गाणी पुढील अनेक वर्षे अजरामर राहतील यात शंका नाही.
अरुभय्या मूळचे इंदूरचे. त्यांना इंदूरचा, तेथील संस्कृतीचा खूप अभिमान होता. तिकडे कार्यक्रमाला जायचे असले की ते खूप खूश असत, इंदूरचे भरभरून कौतुक करत. सर्वोतोपरी अत्यंत आनंदी आयुष्य जगणारा हा कलाकार होता. एकदा कार्यक्रमासाठी देवासला गेल्यावर आम्ही पं. कुमार गंधर्व यांच्याकडे गेलो होतो. दाते त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होते. कुमार गंधर्वांच्या खोलीत बसून अरुण दाते यांच्याकडून त्यांच्या आठवणी ऐकायला मिळणे हा दुर्मिळ योग होता. त्या वेळी लागोपाठ दोन कार्यक्रम झाले. मात्र, दातेंच्या गायनात तिळमात्रही थकवा जाणवला नाही. कोणतेही गाणे गाताना ते कायम उत्साही आणि प्रसन्न असत. प्रत्येक गाणे त्याच तन्मयतेने गाण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
‘शुक्रतारा’चे सलग कार्यक्रम असायचे. मला सर्व कार्यक्रमांमध्ये गाणे शक्य नव्हते. एकदा श्रोता म्हणून मी पुण्यातला कार्यक्रम ऐकायला गेले. अरुण दाते यांनी मला समोर पाहिले आणि गायला स्टेजवर बोलावले. त्यांच्या आग्रहास्तव मी ‘शुक्रतारा’ गायले. एवढ्या उंचीवर पोहोचलेला मोठ्या दिलाचा आणि खुल्या मनाचा माणूस मी आजवर पाहिला नाही. एकदा सारसबागेतल्या गणपती मंदिरात आमची गाण्याची मैफल होती. मी सुरुवातीची तीन गाणी म्हणायची आणि त्यानंतर अरुभय्या गायचे. माझी गाणी गाऊन झाल्यावर मी आत आले आणि ते मला म्हणाले, ‘अहो बाई, तुम्ही खूप सुंदर गायलात. आता मला गाण्याचे टेन्शन आले आहे.’
सोबतीच्या कलाकाराला याहून अधिक प्रोत्साहन काय ठरु शकेल? त्यांचा नितळ, मुलायम आणि तरल आवाज रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य
गाजवत राहील. त्यांच्यासह गाण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. आता यापुढे कधीच अरुभय्यांबरोबर गाता येणार नाही, याची खंत वाटते.