आधार जोडणीमुळे बनावट शिधापत्रिकांना आळा- अरुण देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 09:01 PM2017-12-10T21:01:30+5:302017-12-10T21:02:34+5:30
पुणे : स्वस्त धान्य वाटपासाठी पुरवठा विभागाने नागरिकांची आधार जोडणी करून घेतल्यामुळे बनावट शिधापत्रिका आणि दुबार नावांना आळा बसला आहे.
पुणे : स्वस्त धान्य वाटपासाठी पुरवठा विभागाने नागरिकांची आधार जोडणी करून घेतल्यामुळे बनावट शिधापत्रिका आणि दुबार नावांना आळा बसला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 4 लाख 25 हजार नावे आधार जोडणीमुळे कमी करण्यात आली आहेत. शिधापत्रिकांच्या या स्वच्छता मोहिमेमुळे ख-या लाभार्थ्यांपर्यंत अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ पोहोचविण्यात यश आल्याची माहिती राज्य अन्न आयोग तसेच राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली.
शिधापत्रिका धारकांना आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले होते. अद्यापही ही प्रक्रिया सुरू आहे. अनेकदा पत्ता बदललेल्या, मृत झालेल्या व्यक्तींची नावे शिधापत्रिकेमधून कमी केली जात नाहीत. यासोबतच अनेकांच्या नावे दोन दोन शिधापत्रिका असल्याचीही समोर आली आहेत. त्यामुळे आधार जोडणी करून दुबार नावे वगळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आधार जोडणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुबार नावे कमी करण्यात आलेली आहेत. अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ खरा लाभार्थ्याला मिळतो हे पाहणे मुख्य उद्देश आहे. राज्यामध्ये 2013च्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार लाभार्थ्यांचा इष्टांक 7 कोटी आहे. त्यामध्ये प्राधान्य गट आणि अंत्योदय अशा दोन गटातील लाभार्थी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यांना दरमहा 35 किलो धान्य दिले जाते. 2 रुपये दराने गहू व 3 रुपये दराने तांदूळ देण्यात येतो.
स्वस्त धान्य वाटपातील भ्रष्टाचार आणि काळाबाजार रोखण्यासाठी स्वस्त धान्य केंद्रांवर पॉस मशिन बसविण्यात आलेले आहेत. प्रधान्य गटाचे चार लाख तर अंत्योदयाचे तीन लाख लाभधारक आहेत. शिधापत्रिकेतील प्रत्येक माणसामागे पाच किलो धान्य दिले जाते. बनावट नावे, दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे तशीच असल्याने तसेच बनावट शिधापत्रिका तयार करून या धान्याचा काळा बाजार केला जात होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आजारी व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या महिलांना मात्र अंत्योदयामध्येच ठेवण्यात आलेले आहे. निकषांनुसार ज्यांना प्राधान्य गटात टाकता येईल त्यासंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे.
ज्या शिधा पत्रिकांमध्ये मृत व्यक्तींची नावे असतील, जे लोक स्थलांतरित झाले असतील त्यांनी शिधापत्रिकेतील नावे कमी करावीत. यासोबतच बनावट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून ख-या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. शिधा पत्रिकांची ही स्वच्छता मोहिम मार्चपर्यंत चालणार आहे. मार्चपर्यंत आधार जोडणीचे काम पूर्ण होईल असेही देशपांडे यांनी सांगितले. आधार जोडणी नसलेले खरे लाभार्थी वंचित राहू नयेत याचीही दक्षता घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
==============
बँका, पॅन कार्ड, प्राप्तिकर विभाग, शाळा-महाविद्यालये आदींसह जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे. शिधापत्रिकांशी आधार कार्ड जोडल्यामुळे राज्यामध्ये 92 लाखांपेक्षा अधिक बनावट, दुबार शिधापत्रिका बंद करण्यात आल्या आहेत. याचा लाभ ख-या लाभार्थ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.