चांगल्या कामाचा आनंद लाखमोलाचा : चंद्रशेखर शेठ; अरुणा-मोहनगौरव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:11 PM2018-01-29T12:11:21+5:302018-01-29T12:13:12+5:30
सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अरुणा-मोहनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार संस्थेच्या शैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे : ‘सामाजिक कार्याला पैशांची कमतरता भासत नाही. त्या कार्याची आवड आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल तर पैसा आपोआप उभा राहतो. एखादे चांगले काम केले तरी त्यातून मिळणारा आनंद लाखमोलाचा असतो. या आनंदाची अनुभूती प्रत्येक नागरिकाने घ्यावी,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांनी व्यक्त केले.
वंचित विकास संस्थेतर्फे अरुणा मोहन गाडगीळ या दांपत्याच्या स्मृतिनिमित्त सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अरुणा-मोहनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार संस्थेच्या शैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी वंचित विकासचे संस्थापक डॉ. विलास चाफेकर, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष व संचालिका सुनीता जोगळेकर, कार्यवाह मीना कुर्लेकर उपस्थित होते.
शेठ म्हणाले, ‘सामाजिक कार्य म्हणजे खूप अवघड काम असते, असे नाही. प्रत्येक व्यक्ती हे काम करू शकते. इतरांसाठी लहानसे काम करूनही सामाजिक कार्यात सहभागी होता येते. त्यामुळे प्रत्येकाने चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा.’
बाळकृष्ण भागवत म्हणाले, ‘समाजामध्ये विश्वास संपादित केला, तर मदत करणाऱ्या हातांची कमतरता जाणवत नाही. यातून मिळणारे समाधान लाखमोलाचे असते. यामुळेच आयुष्याचा शंभरीपर्यंत वंचित बांधवांसाठी काम करेल, याचा विश्वास वाटतो.’
या वेळी अभया महिला गटातील महिलांना देण्यात आलेल्या उद्योजकता प्रशिक्षणातील सहभागी मृणाल शुक्ला, अंकिता गोंगले, धनश्री डोके, जेनी लामा, प्रमिला राव, वैशाली पुरकर, माधवी कुंभार, अनघा खिस्ती, अलका गुंजनाळ, अनुजा पाटील, लीनता साने, रिताराणी शितोळे, पल्लवी वाघ यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. देवयानी गोंगले यांनी प्रास्ताविक केले.
वंचित विकास संस्थेसाठी काम करणे ही नेहमीच आनंददायी बाब असते. यापुढेही जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत संस्थेसाठी काम करीत राहण्याचे ठरवले आहे. संस्थेमुळे ज्यांचा विकास झाला, त्यांनी पुढे येऊन संस्थेच्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा.
- शैला टिळक